शिवसेनेतर्फे बाजार समितीचे प्रशासक धारेवर
By admin | Published: April 29, 2015 11:47 PM2015-04-29T23:47:17+5:302015-04-30T00:22:19+5:30
तीव्र आंदोलनाचा इशारा : घोटाळ्याबाबत सखोल चौकशीचे रंजन लाखे यांचे आश्वासन
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या आणि कृषिपूरक व्यवसाय सोडून इतर व्यवसायांना परवानगी दिल्याच्या कारणावरून शिवसेनेच्यावतीने बुधवारी बाजार समितीमध्ये प्रशासकांना चांगलेच धारेवर धरले. घोटाळ्याचा अहवाल प्रधान सचिवांना देण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. बाजार समितीचे प्रशासक रंजन लाखे यांनी याबाबत सखोल चौकशी करून याबाबतचा सविस्तर अहवाल सहकारमंत्र्यांच्या प्रधान सचिवांकडे पाठवू, असे आश्वासन आंदोलकांना दिले.
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, बाजार समितीमधील पूर्र्वीच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराबाबत आपण तयार केलेल्या अहवालाची अद्याप अंमलबजावणी का झाली नाही? शेतीशी संबंधित नसलेल्या संस्थांना जागा देण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांना कवडीमोल दरात जागा दिल्या आहेत. अशा लुटारू संचालकांवर कारवाईसाठी कोणतीच पावले उचलली का जात नाहीत, याचा जाब विचारत प्रशासकांना चांगलेच धारेवर धरले. बाजार समितीची लूट करणाऱ्या व्यापारी आणि माजी संचालकांवर कारवाई करावी, तसेच अपात्र ठरविलेल्या संचालकांना बाजार समितीच्या निवडणुकीपासून रोखावे, अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीची दखल घेतली नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
विजय देवणे, कमलाकर जगदाळे, रवी चौगुले, विनायक साळुंखे, बाजीराव पाटील, प्रा. शिवाजी पाटील, सुजित चव्हाण, प्रवीण सावंत, तानाजी आंग्रे, हर्षल सुर्वे, विराज पाटील, प्रवीण पालव, सुषमा चव्हाण, सुजाता सोहनी, रंजना आंबेकर, दीपाली शिंदे, कमल पाटील, सुमन शिंदे, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रश्नांवर धरले धारेवर...
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या अहवालाची अद्याप अंमलबजावणी का झाली नाही ? राजर्षी शाहू सांस्कृतिक हॉलचा ज्या कंपनीशी करार झाला आहे, तो त्वरित रद्द करावा. समितीच्या आवारात झालेले अतिक्रमण हटविण्यात कुचराई करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनागोंदी कारभार, शेतीपूरक उद्योग सोडून अन्य उद्योगांना दिलेली परवानगी यांसह विविध मुद्द्यांवर जाब विचारला.