शिवसेनेचा कल भाजपकडे...

By admin | Published: March 20, 2017 01:02 AM2017-03-20T01:02:46+5:302017-03-20T01:03:06+5:30

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे शर्थीचे प्रयत्न; उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवड

Shivsena's move to BJP ... | शिवसेनेचा कल भाजपकडे...

शिवसेनेचा कल भाजपकडे...

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सत्तासंघर्षात शिवसेनेच्या बहुतांश सदस्यांचा कल भाजपकडे असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपचे पारडे जड वाटत असले तरी कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे शर्थीचे प्रयत्न पाहता सत्तेचा लंबक दोलायमान अवस्थेतच आहे.
भाजता आणि दोन्ही कॉँग्रेसदरम्यान जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठीचा संघर्ष २३ फेब्रुवारीपासून सुरू आहे. शिवसेनेला १० जागा मिळाल्यामुळे त्यांच्या भूमिकेला कमालीचे महत्त्व आले; परंतु ‘मातोश्री’चा स्वतंत्र आदेश येणार नसल्याचे स्पष्ट असल्याने शिवसेनेच्या आमदारांनी आपल्या पुढच्या विधानसभेचा विचार करून आपापल्या भूमिका घेतल्याचे रविवारी स्पष्ट झाले.
सायंकाळी रेसिडेन्सी क्लबवर शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, शिवसेनेचे नेते संजयबाबा घाटगे, आदींनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार सुरेश हाळवणकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे सदस्य अंबरीश घाटगे हेदेखील होते. हे सर्वजण चर्चा करून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच माजी आमदार महादेवराव महाडिक आणि ताराराणी आघाडीचे अध्यक्ष
स्वरूप महाडिक हेही ‘रेसिडन्सी’वर दाखल झाले.
गेल्या दोन दिवसांमध्ये महाडिक थेट या मैदानामध्ये उतरल्याने या सत्तासंघर्षातील काही मोहऱ्यांनी आपली भूमिका भाजपला पूरक अशी घेण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे रविवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्याआधीच मुंबईत आमदारांची आणि त्यांची काही प्रमाणात चर्चा झालीच होती. रविवारी संध्याकाळी याबाबत पुन्हा शिक्कामोर्तब झाल्याने शिवसेनेचे बहुतांश सदस्य भाजपसोबतच जातील, अशी शक्यता बळावली आहे. दरम्यान, कॉँग्रेसने या निवडणुकीसाठी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी संध्याकाळी हॉटेल सयाजीवर सतेज पाटील, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, हसन मुश्रीफ यांच्याशी सविस्तर चर्चा करून आढावा घेतला.
आवाडे यांचा बंडा मानेंसाठी आग्रह
राहुल पाटील यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला अध्यक्षपद देऊन रिस्क घेण्यापेक्षा बंडा माने या माजी उपाध्यक्षांचे नाव प्रकाश आवाडे यांनी समोर आणले आहे. निरीक्षक रमेश बागवे यांच्यासमोर त्यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे आणखी काही मते मिळतील, असा दावा त्यांनी केला.
एक-दोघे गैरहजर राहण्याची शक्यता
एकीकडे भाजपने शिवसेनेच्या सदस्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांशी स्वतंत्र चर्चा करून सकारात्मक पावले उचलली असून, त्यांना तसा प्रतिसादही मिळाला आहे. शिवसेनेच्या बहुतांश सदस्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच्याही पुढे जात दगाफटका होऊ नये यासाठी राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमधील एक-दोन जणांना गैरहजर ठेवण्याची क्लृप्तीही ‘भाजता’कडून लढविली जाण्याची शक्यता आहे.
अरूण दुधवडकर आज करणार चर्चा
शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर हे सोमवारी कोल्हापुरात येणार असून ते सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाप्रमुख व शिवसेनेच्या आमदारांशी चर्चा करणार आहेत.


आवाडे आमच्यासोबत
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा निरोप प्रकाश आवाडे यांना दिला आहे. त्यामुळे आवाडे पक्षासोबतच राहतील, असा विश्वास निरीक्षक माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला आहे. मी आणि मुश्रीफ यांनी आवाडे यांच्याशी चर्चा केली असून, ते आमच्यासोबत राहतील, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अध्यक्ष आमचाच : चंद्रकांतदादा
काहीही झाले तरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचाच होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सत्ता बनविण्यासाठी मुंबईहून कोल्हापूरला आलो आहे, असे सांगत पाटील यांनी आपला आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला.

सतेज-मुश्रीफ यांनाही सत्तेचा विश्वास
संध्याकाळी आमदार सतेज पाटील आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कॉँग्रेसचाच होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. आमची गोळाबेरीज झाली असून सत्ता संपादन करण्यात कोणतीच अडचण नसल्याचे या दोघांनी सांगितले.

Web Title: Shivsena's move to BJP ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.