‘थेट पाईपलाईन’मधील भ्रष्टचाराविरुध्द शिवसेनेचे आंदोलन

By admin | Published: May 10, 2017 05:28 PM2017-05-10T17:28:26+5:302017-05-10T17:28:26+5:30

काम बंद, कर्मचाऱ्यांना पिटाळले , पुन्हा काम सुरु ठेवल्यास ठोकण्याचा इशारा

Shivsena's movement against corruption in 'Live Pipeline' | ‘थेट पाईपलाईन’मधील भ्रष्टचाराविरुध्द शिवसेनेचे आंदोलन

‘थेट पाईपलाईन’मधील भ्रष्टचाराविरुध्द शिवसेनेचे आंदोलन

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.१0 : शहराला शुध्द व मुबलक पाणी पुरवठा होण्याकरीता राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा निकृष्ठ दर्जा आणि त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ बुधवारी शिवसैनिकांनी योजनेचे चार ठिकाणचे काम बंद पाडले. तसेच कामावरील कर्मचाऱ्यांना मशिनरीसह पिटाळून लावले तर पुईखडी येथील ठेकेदार व सल्लागार कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले.

युनिटी कन्सल्टंटच्या फलकास काळे फासण्यात आले. योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरीता राज्य सरकार जोपर्यंत चौकशी समिती नेमणार नाही तोपर्यंत योजनेचे काम सुरु होऊ देणार नाही आणि जर ते सुरु करण्याचा प्रयत्न केलाच तर मात्र मशिनरी फोडण्याचा तसेच कर्मचाऱ्यांना ठोकण्याचा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला.

ज्या राजकीय नेत्यांनी ही योजना मंजूर करुन आणली त्यांच्या खऱ्या चेहऱ्यावरील बुरखे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फाडावेत, असे आवाहन जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केले. थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा दर्जा आणि त्यामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारासंबंधी महानगरपालिका आयुक्त यांनी सविस्तर खुलासा करुन कोल्हापूरच्या जनतेला माहिती द्यावी अन्यथा योजनेचे काम बंद पाडणार असा इशारा शिवसेनेने गेल्या महिन्यात दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी शिवसेनेने प्रत्यक्ष कामकाज सुरु असलेल्या ठिकाणी निदर्शने करीत काम बंद पाडले.

वाशी येथून आंदोलनास सुरवात झाली. वाशी येथे दोन जेसबी, ट्रॅक्टर, गॅस वेल्डींग मशिन यासह काम करणाऱ्या १० ते १२ कर्मचाऱ्यांना शिवसैनिकांना काम बंद ठेवण्याचे आवाहन केले. तसेच यंत्रे घेऊन तेथून निघून जाण्याची सुचना केली. अचानक शिवसैनिक आल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी तात्काळ काम थांबवून तेथून निघून जाणे पसंत केले. अशाच प्रकारे कांडगाव, देवाळे येथील काम बंद पाडून कर्मचाऱ्यांना पिटाळून लावण्यात आले. त्यानंतर शिवसैनिकांनी ठिकपुर्लीजवळील ब्रीजच्या कामाची पाहणी केली. सर्व शिवसैनिक या लोखंडी ब्रीजवर जाऊन निदर्शने केली. त्यानंतर सर्व शिवसैनिक पुईखडी येथील जलशुध्दीकरण केंद्र उभारणी सुरु असलेल्या ठिकाणी पोहचले. तेथे सुमारे २५ ते ३० कर्मचारी स्लॅब टाकण्याचे काम करीत होते. शिवसैनिकांना पाहून या कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. परंतु स्लॅब टाकण्याचे काम आधी पूर्ण करा ते पूर्ण झाले की मगच काम बंद ठेवा असे त्यांना शिवसैनिकांनी सांगितले. त्यामुळे कर्मचारी पुन्हा काम करायला लागले. त्याठिकाणी असलेल्या जीकेसी प्रोजेक्ट प्रा. लि. या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांचा मोर्चा वळला. तेथील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले. तसेच कार्यालयास कुलुप लावले. नंतर शिवसैनिक युनिटी कन्सल्टंटच्या कार्यालयात गेले. तेथील कर्मचाऱ्यांनाही पिटाळले. कार्यालयास कुलुप लावले. त्याठिकाणी कंपनीच्या नावाच्या फलकास काळे फासले.

जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण,शिवाजीराव पाटील, रवी चौगुले, अवधुत साळोखे, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, विराज पाटील, दिलीप जाधव, दत्ताजी टिपुगडे, राजेंद्र पाटील, शशिकांत बिडकर, राजू जाधव, विनोद खोत, भगवान कदम, दिलीप देसाई, कृष्णात पोवार आदी सहभागी झाले होते.

तुझ्या कंपनीनंच लुटलंय

युनिटी कन्सल्टंटच्या कार्यालयात सोलापूरहून आलेले अधिकारी बी. आर. जाधव आतील खोलीत काम करीत बसले होते. बाहेर शिवसैनिकांचा गोंधळ सुरु असतानाही ते बाहेर आले नाहीत. त्यामुळे शिवसैनिक आत घुसले. त्यांना तेथून बाहे काढले. बाहेर आल्यावर हा अधिकारी शिवसैनिकांना उद्देशून ‘मी सोलापूरहून आलो असलो तरी तुमच्याइतकच माझंही कोल्हापूरवर प्रेम आहे. त्यामुळे माझी कंपनी आणि मी या योजनेचे चांगलंच काम करु’ असे म्हणताच शिवसैनिक खवळले.‘तुझ्या कंपनीनंच कोल्हापूरला लुटलंय, चल ऊठ आजच्या आजच सोलापूरच्या गाडीत बसायचं, कोल्हापुरात थांबायचं नाही’अशा एकेरी भाषेत त्यांचा पाणउतारा केला.

लोकप्रतिनिधींचा बुरखा फाडा

थेट पाईपलाईन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची तज्ज्ञ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमावी आणि ज्यांनी ही योजना मंजूर करुन आणली त्या लोकप्रतिनिधींचा भ्रष्टाचाराचा बुरखा फाडावा, अशी मागणी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली. जोपर्यंत चौकशी समिती नेमली जाणार नाही तोपर्यंत आम्ही काम सुरु करुन देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कोल्हापूरकरांनी पंचवीस वर्षे संघर्ष केला तेंव्हा ही योजना मंजूर झाली. योजनेत राज्य व केंद्र सरकारने जरी पैसे घातले असले तरी ते जनतेचेच आहेत. त्यामुळे अशा पैशावर कोणी डल्ला मारत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पालकमंत्री पाटील यांनी तातडीने याप्रकरणात लक्ष घालावे, असे पवार म्हणाले. आणखी चार सहा महिने विलंब झाला तर हरकत नाही, पण योजनेचे काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावे. पुढच्या काळात जलवाहिन्या फुटल्या असे प्रकार घडू नयेत म्हणून आत्ताच दक्षता घेतली पाहिजे. तज्ज्ञ कर्मचारी नेमून योजनेचे काम पूर्ण करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

Web Title: Shivsena's movement against corruption in 'Live Pipeline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.