भाजपच्या माघारीने शिवसेनेला मोकळीक

By admin | Published: December 14, 2015 01:08 AM2015-12-14T01:08:11+5:302015-12-14T01:11:47+5:30

नरके, सरुडकर महाडिकांकडे; मंडलिक सतेज पाटलांबरोबर

Shivsena's release by the BJP's exit | भाजपच्या माघारीने शिवसेनेला मोकळीक

भाजपच्या माघारीने शिवसेनेला मोकळीक

Next

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या रिंगणातून भारतीय जनता पार्टीने माघार घेतल्याने शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची जवळीकता पाहता, आमदार चंद्रदीप नरके व आमदार सत्यजित पाटील-सरुडकर हे आमदार महादेवराव महाडिक यांच्या पाठीशी, तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर यांचा गट सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची शक्यता अधिक आहे.
कॉँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्याविरोधात आमदार महाडिक यांनी अपक्ष राहून शड्डू ठोकल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पाटील व महाडिक यांच्या दृष्टीने अस्तित्वाची लढाई असल्याने दोन्ही बाजूंनी शेवटपर्यंत शह-काटशहाचे राजकारण सुरू राहणार आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व जनसुराज्य या पक्षांचा पाठिंबा पाहता सतेज पाटील यांनी आताच गुलाल उधळण्यास हरकत नव्हती; पण विधानपरिषदेच्या २००३ चा बिनविरोधचा अपवाद वगळता गेल्या १९९७ व २००९ च्या निवडणुकीतील इतिहास पाहता अनुक्रमे विजयसिंह यादव व प्रा. जयंत पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक यांची दमछाक केली होती. या निवडणुकीत पक्ष, निष्ठा, पैसा यांपेक्षा एकमेकांचे उट्टे काढण्याचे राजकारण उफाळून येते. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व जनसुराज्य पक्ष या तिन्ही पक्षांच्या मतदारांची संख्या २६८ पेक्षा अधिक जाते. त्यामुळे सतेज पाटील यांचा विजयाचा मार्ग मोकळा दिसतो; पण वस्तुस्थिती तशी नाही. राष्ट्रवादीपेक्षा पाटील यांना कॉँगे्रेसअंतर्गत गटबाजीपासून सावध राहण्याची गरज आहे.
भरमूअण्णा पाटील, नरसिंग पाटील, बजरंग देसाई या कॉँग्रेस नेत्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. ‘गोकुळ’चे राजकारण पाहता हे नेते कोणाला मदत करणार, हे उघड गुपित आहे. जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, संजीवनीदेवी गायकवाड यांनी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पी. एन. पाटील हे कॉँग्रेस सोडून काही करणार नसले तरी त्यांनी अद्याप पत्ते खोललेले नाहीत.
शिवसेनेची मते कमी असली तरी ती निर्णायक ठरणार आहेत. आमदार चंद्रदीप नरके यांचे चार जिल्हा परिषद सदस्य, आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांचे तीन जिल्हा परिषद व सहा मलकापूरचे नगरसेवक असे नऊ मतदान आहे. संजय मंडलिक कॉँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. तरीही सध्या ते शिवसेनेचे पदाधिकारी असल्याने त्यांची व संजय घाटगे यांची अशी १७, तर आमदार राजेश क्षीरसागर यांचे चार नगरसेवक आहेत. सरुडकर हे पाटील यांचे नातेवाईक आहेत; पण ‘गोकुळ’चे राजकारण पाहता ते महाडिक यांच्यासोबतच राहतील.


अशी मिळतील मते
नरके व सरुडकरांची १३ मते महाडिक यांना, तर मंडलिक-घाटगे, क्षीरसागर यांची २१ मते पाटील यांना मिळू शकतात. एकंदरीत, भाजपच्या माघारीमुळे शिवसेनेची मोकळीक झाल्याने नेते धर्मसंकटातून सुटले आहेत.

Web Title: Shivsena's release by the BJP's exit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.