शिवसेनेला बंडखोरीची लागण
By admin | Published: October 4, 2015 12:37 AM2015-10-04T00:37:24+5:302015-10-04T00:37:24+5:30
निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप : ‘तटाकडील’मधून राजू जाधव अपक्ष
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी तटाकडील प्रभागातून शिवसेनेच्यावतीने उमेदवारी डावलल्याने शिवसेना रिक्षाचालक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले, तर दुधाळी प्रभागातूनही शिवसेनेचे दुधाळी शाखाप्रमुख सतीश ढवळे अथवा भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख नितीन पाटील यांनीही दोघांपैकी एकजण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. तटाकडील तालीम आणि दुधाळी प्रभागातूनही उमेदवार जाहीर केले आहेत. निष्ठावंतांना उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले.
शिवसेनेच्यावतीने बुधवारी पहिली ४१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती व त्यानंतर शनिवारी १७ उमेदवार जाहीर केले. यामध्ये शिवसेनेच्यावतीने निष्ठावंतांना उमेदवारी दिल्याचा दावा नेत्यांनी केला आहे; पण तटाकडील तालीम प्रभाग क्र. ४८ मधून रिक्षाचालक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती; पण ऐनवेळी या प्रभागातून माजी महापौर उदय साळोखे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या राजू जाधव यांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले. यापूर्वी उदय साळोखे व त्यांची पत्नी पूजाश्री साळोखे हे शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते; पण त्यानंतर ते जनसुराज्य पक्षातर्फे महापौर झाले.
शनिवारी उमेदवारी निश्चितीच्या यादीत उदय साळोखे यांना तटाकडील तालीम प्रभागातून पुन्हा उमेदवारी दिल्याने दुसरे इच्छुक राजू जाधव हे नाराज झाले. जाधव यांनी, गेली वीस वर्षे शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ, प्रामाणिकपणे राहिलो, आंदोलनात सहभाग घेतला, पण त्याचे हेच फळ का? असाही प्रश्न उपस्थित करून निवडणुकीत झालेल्या अन्यायाविरोधात अपक्ष म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले.
दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी काँग्रेसी विचाराशी बांधील असणाऱ्या तसेच शिवसेनेच्या ध्येयधोरणांचा काहीही गंध नसणाऱ्याला देऊन निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख नितीन पाटील व दुधाळी शिवसेना शाखाप्रमुख सतीश ढवळे यांनी केला आहे. या प्रभागातून दुधाळी शाखेच्यावतीने यशवंत ऊर्फ नाना सुर्वे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याबाबत शिफारस केली होती; पण कोल्हापुरात स्वत:ला शिवसेनेचा सर्वेसर्वा समजणाऱ्या एका नेत्याने केवळ मैत्री जपण्यासाठी काँग्रेसी विचारांच्या व्यक्तीस उमेदवारी दिल्याचा आरोप ढवळे आणि पाटील यांनी केला.