शिवशाही, ब्रिक करारातून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:21 AM2018-10-22T00:21:12+5:302018-10-22T00:21:16+5:30

भोगावती : शिवशाही आणि ब्रिक ही दोन भ्रष्टाचाराची व्यासपीठ आहेत. महामंडळाच्या यांच्याबरोबर झालेल्या करारातून एस. टी. महामंडळाची कोट्यवधीची लूट ...

Shivshahi, Brick robbed of contract | शिवशाही, ब्रिक करारातून लूट

शिवशाही, ब्रिक करारातून लूट

Next

भोगावती : शिवशाही आणि ब्रिक ही दोन भ्रष्टाचाराची व्यासपीठ आहेत. महामंडळाच्या यांच्याबरोबर झालेल्या करारातून एस. टी. महामंडळाची कोट्यवधीची लूट सुरू आहे. याच्या आडूनच एस. टी.चा खासगीकरणाचा डाव आखला जात आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य इंटक संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केला आहे. भ्रष्टाचार सहनशीलतेच्या बाहेर गेला असून, याची चौकशी करावी, अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
परिते (ता. करवीर) येथे महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या कोल्हापूर विभागीय कर्मचारी मेळावा आणि सत्कार समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
छाजेड म्हणाले, शिवशाहीबरोबर केलेल्या करारातील अटी अत्यंत जाचक आहेत. शिवशाहीच्या गाडीत कोणी बसो अगर न बसो, एस.टी.ने ७९ रुपये किलोमीटरने पैसे शिवशाहीला द्यायचेच. यात डिझेलदेखील एस. टी.ने टाकायचे आहे. एस. टी. कर्मचाऱ्यांची चूक झाल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करून शिवशाहीने घ्यावयाचा. प्रवासी नसल्याने राज्यात काही मार्गांवरून एस. टी. चालत नाही म्हणून बंद केली आहे. त्या मार्गावर शिवशाही सुरू करावयाची अशा पद्धतीने हळूहळू एस. टी. संपविण्याचा डाव आखला जात आहे.
यावेळी सेवानिवृत्त झालेले वाहतूक निरीक्षक मधुकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महामंडळाचे माजी महाव्यवस्थापक आर. सी. पाटील, मधुकर पाटील, इंटकचे राज्य सरचिटणीस मुकेश तिगोटे यांची भाषणे झाली. ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, बंडोपंत वाडकर, आनंदराव पाटील, सयाजीराव घोरपडे, डी. पी. बनसोडे, रामभाऊ कदम, जयकुमार देसाई, एम. डी. पोवार, पी. व्ही. पावसकर, एस. के. पाटील, के. एम. कुलकर्णी, अजय पाटील, आनंदा दोपरे, दयानंद पाटील, कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उत्तम पाटील, एन. डी. पाटील, राजेंद्र कुलकर्णी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्यथा न्यायालयात जाऊ
एक किंवा दोन रुपयांचा फरक आढळून आल्यास एस. टी. चालकाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणारे सरकार ब्रिक आणि शिवशाहीला कोट्यवधी रुपये मुक्त हाताने देत आहे. याची तत्काळ चौकशी व्हावी, अशी मागणी जयप्रकाश छाजेड यांनी केली आहे. सरकारने याची दखल घेतली नाही तर महाराष्ट्र इंटक संघटना न्यायालयात जाणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Shivshahi, Brick robbed of contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.