शिवशाही बसची धडक, बालिका ठार, शिरोली-सांगली फाटासमोर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:33 PM2019-06-05T12:33:27+5:302019-06-05T12:42:53+5:30
शिवशाही बसने मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील समृद्धी विकास पाटील (वय.११,रा.चांदोली वसाहत समोर, शिगाव ता.वाळवा,जि. सांगली) बालिका ठार झाली तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत.
शिरोली/कोल्हापूर : शिवशाही बसने मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील समृद्धी विकास पाटील (वय.११,रा.चांदोली वसाहत समोर, शिगाव ता.वाळवा,जि. सांगली) बालिका ठार झाली तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत.
या बालिकेच्या अंगावरून एसटीचे चाक गेल्याने ती ठार झाली तर विकास हंबीरराव पाटील आणि कल्पना विकास पाटील हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास शिरोली-सांगली फाटा शबनम धाब्या समोर झाला.
विकास पाटील व त्यांच्या पत्नी कल्पना, मुलगी समृद्धीसह मोटरसायकलवरून सांगलीहून शिरोली मार्गे शिगावला चालले होते. सकाळी सहाच्या सुमारास शिरोली-सांगली फाटा येथे कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवशाही एसटी बसने मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिली. यात विकास पाटील व कल्पना पाटील हे गाडीवरून जोराचे बाजूला फेकले गेले तर समृद्धी ही एसटी बसच्या चाकाखाली सापडली.
या सर्वांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केले, समृद्धीवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला, तर विकास व कल्पना पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसटी बस चालक अनिल दुर्गुळे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.