भव्य मिरवणुकांतून अवतरली शिवशाही
By Admin | Published: April 29, 2017 01:06 AM2017-04-29T01:06:48+5:302017-04-29T01:06:48+5:30
शहरात शिवजयंती उत्साहात : पारंपरिकतेबरोबर आधुनिकतेचा प्रभाव; तरुण मंडळांच्या एकीचे बळ
कोल्हापूर : ‘जय... जय... जय... शिवाजी’चा गजर, पारंपरिक वाद्यांचा अखंड निनाद, भिरभिरणारे भगवे ध्वज आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, मावळे, घोडे, बैलगाड्या, उंट आदी लवाजमा अशा जल्लोषी वातावरणात शहरात शुक्रवारी परंपरेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली. यावर्षी विविध परिसरातील अनेक मंडळे संघटित झाल्याने शिवजयंतीचा उत्सव संयुक्तपणे मोठ्या उत्साहात रंगला.
राजारामपुरी, रविवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, जुना बुधवार पेठ, मंगळवार पेठ परिसरातील अनेक मंडळांनी संयुक्त शिवजयंती उत्सव साजरा केला. या मंडळांसह शिवाजी पेठ, शाहूपुरी, कसबा बावडासह उपनगरांतील विविध मंडळांतर्फे सकाळी शिवजन्मकाळ सोहळा साजरा झाला. त्यानंतर मंडळांचे कार्यकर्ते मिरवणुकीच्या तयारीला लागले. सायंकाळी सहाच्या सुमारास मिरवणुकींना सुरुवात झाली. मर्दानी खेळ, ढोलपथके, शिवराय, संभाजीराजे छत्रपती यांच्या जीवनावरील विविध सजीव देखावे, बैलगाडी व विविध वाहनांवरील प्रबोधनपर फलक आणि रंगीबेरंगी लेसर लाईट, डिजिटल वॉल आदी, या मिरवणुकीची वैशिष्ट्ये होती.
मिरवणुकीतील बहुतांश कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. त्यात आबालवृद्ध उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील अनेक परिसरातील गल्ली-बोळ ‘शिवमय’ झाले होते. लहान मुलांनी आपल्या गल्ली, कॉलनीतील चौकांमध्ये अथवा ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल, त्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा, प्रतिमेचे पूजन केले होते. सायंकाळी छत्रपती शिवाजी चौक, शिवाजी पेठेतील अर्धा शिवाजी पुतळा येथील परिसर नेत्रदीपक आकर्षक विद्युत रोषणाई झळाळून गेला होता.
जल्लोषी वातावरणात निघालेल्या मिरवणुकांमध्ये कोल्हापूरकर, शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुुकीदरम्यान शहरात विविध मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, जिल्हा वीरशैव लिंगायत समाजातर्फे शिवजयंती व बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधत चित्रदुर्ग मठ येथे सायंकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. मंगळवार पेठ परिसरातील कैलासगड स्वारी मंदिरात सकाळी ११.४५ वाजता शिवजन्मकाळ सोहळा झाला. यावेळी परिसरातील महिला उपस्थित होत्या.
अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा मिरवणुकींमध्ये समावेश केला होता. मात्र, काही मंडळांनी यासह मोठ्या आवाजाच्या क्षमतेची ध्वनियंत्रणा, डॉल्बी लावला होता. या ध्वनियंत्रणा, डॉल्बीवर शिवरायांवरील गीते लावली होती. यावर तरुणाईने नृत्याचा ठेका धरला होता. डॉल्बी लावून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्यास पोलिसांनी संबंधित मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता, असे असतानादेखील मिरवणुकीमध्ये डॉल्बी दणाणल्याचे दिसले.
प्रबोधन, सामाजिक कार्याची जोड
शहरातील विविध मंडळांनी शिवजयंतीला प्रबोधन आणि सामाजिक कार्याची जोड दिली. त्यात छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे, रणरागिणी ताराराणी, आदींच्या इतिहासाची ओळख करून देणारी व्याख्याने, शिवनाट्य पोवाडा, सोंगी भजन आदींद्वारे प्रबोधन केले शिवाय रक्तदान शिबिर, गरजूंना मदतीचा हात अशा स्वरुपातील सामाजिक उपक्रमदेखील राबविले.
महिला, युवतींचा सहभाग
गेल्या आठ दिवसांपासून शिवजयंतीनिमित्त अनेक मंडळांतर्फे विविध उपक्रम, कार्यक्रम घेण्यात आले. त्यात महिला, युवतींचा लक्षणीय सहभाग होता. मिरवणुकींमधील सजीव देखावे, पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाल्या होत्या.
लोकप्रतिनिधींचा दौरा
शिवजयंतीनिमित्त विविध मंडळांनी त्यांच्या मिरवणुकींच्या उद्घाटन लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी सायंकाळी महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा काहीसा अनौपचारिक दौरा झाला.