शिवशाहू चषक! कोल्हापुरात रविवारी शिवाजी विरुद्ध पीटीएम हायव्होल्टेज सामना
By संदीप आडनाईक | Published: April 5, 2024 09:06 PM2024-04-05T21:06:29+5:302024-04-05T21:07:52+5:30
संयुक्त जुना बुधवारचा पराभव
कोल्हापूर - संयुक्त जुना बुधवारपेठ संघाला पाटाकडील तालीम मंडळाच्या गोलची बरोबरी साधता न आल्यामुळे शुक्रवारचा सामना पीटीएम संघाने २ विरुद्ध १ गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. पीटीएम संघाचा आरबाज पेंढारी सामनावीर आणि संयुक्त जुना बुधवारपेठ संघाचा सुशील सावंत लढवय्या खेळाडू ठरला. दरम्यान, उद्या, शनिवारी सामन्याला सुटी असून रविवारी दुपारी ४ वाजता पीटीएम विरुध्द शिवाजी तरुण मंडळ यांच्यात हायव्होल्टेज अंतिम सामना होणार आहे.
येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु असलेल्या शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेच्या ११ व्या दिवशीच्या उपांत्य फेरीतील सामना पीटीएम (अ) विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात अटीतटीचा झाला. पूर्वाधात बुधवारपेठ संघाकडून खोलवर चढाया झाल्या, सामन्याच्या अवघ्या सहाव्या मिनिटालाच रोहन मंडलिक याने गोल करुन संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली, परंतु ही आघाडी फार काळ बुधवारपेठ संघाला टिकवता आली नाही, सामन्याच्या १४ व्या मिनिटालाच पीटीएमच्या आरबाज पेंढारी याने कॉर्नर पासवर हेडव्दारे गोल करुन १-१ अशी बरोबरी केली. मध्यांतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीतच राहिला, उत्तरार्धात मात्र दोन्ही संघाकडून गोलसाठी आटोकाट प्रयत्न झाले. अखेर सामन्याच्या ५४ व्या मिनिटाला ओंकार पाटील याने मैदानी गोल करुन संघाला २-१ अशी भक्कम आघाडी मिळवून विजय मिळवून दिला.
हेरेकर, मेथे, पाटील यांची जादू फिकी
संयुक्त बुधवारपेठ संघाचा अभिजित साळोखे, सुशील सावंत, पृथ्वीराज निकम, साहिल खोत, रविराज भोसले, सचिन गायकवाड यांनी बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, तर पीटीएमच्या प्रथमेश हेरेकर, ऋषिकेश मेथे, पाटील यांच्या प्रभावी खेळाची जादू या सामन्यात दिसून आली नाही.
तिकिटविक्री उद्या सुरु
अंतिम सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. याची तिकिटविक्री शाहू स्टेडियमवर उद्या, शनिवारी सुरु राहणार आहे.