‘दौलत’साठी ८० कोटींची ‘शिवशक्ती’ची तयारी
By admin | Published: March 5, 2016 12:38 AM2016-03-05T00:38:04+5:302016-03-05T00:38:20+5:30
निविदा प्रक्रियेतही अपयश : ४० वर्षे भाड्याने घेण्याची तयारी
कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना ८० कोटी रुपयांना विकत घेण्याची तयारी शिवशक्ती शुगर्स, लिमिटेड, सौंदत्ती यांनी दाखविली आहे. याबाबत ‘शिवशक्ती’ने भरलेली निविदा शुक्रवारी उघडण्यात आली असून, यामध्ये त्यांनी खरेदी बरोबर ४० वर्षे भाडेतत्त्वावर घेण्याची तयारीही दर्शविली आहे. ‘दौलत’बाबत प्रसिद्ध केलेल्या नवव्या निविदा प्रक्रियेत जिल्हा बॅँकेस अपयश आले आहे.
जिल्हा बॅँकेच्या ६७ कोटी थकीत कर्जासाठी ‘दौलत’ विक्रीची निविदा प्रसिद्ध केली होती. यासाठी केवळ ‘शिवशक्ती शुगर्स’ने निविदा दाखल केली होती. शुक्रवारी दुपारी एक वाजता निविदा उघडण्यात आली. यामध्ये ८० कोटी रुपयांना कारखाना खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे; पण कारखान्याची अपसेट प्राईस २२० कोटी रुपये असल्याने त्यापेक्षा कमी किमतीबाबत बॅँकेला निर्णय घेता येत नाही. ‘शिवशक्ती’ने ४० वर्षे मुदतीने कारखाना भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत बॅँकेने भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
अपसेट प्राईसपेक्षा कमी किमतीत कारखाना देऊ शकत नाही; पण ‘शिवशक्ती’ने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दुसरा पर्याय दिला आहे. कारखान्याचा परवाना धोक्यात आल्याने ४० वर्षे भाडेतत्त्वावर द्यायची की नवीन अपसेट प्राईस ठरविण्यासाठी नवीन मूल्यांकन करायचे याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होईल. १० मार्चला अमित कोरे चर्चेसाठी येणार आहेत, ते जो प्रस्ताव देतील तो मान्यतेसाठी संचालकांसमोर ठेवला जाईल.
- आमदार हसन मुश्रीफ
(अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅँक)
१० मार्चला निर्णय!
कारखाना भाडेतत्त्वावर घेण्याबाबत ‘शिवशक्ती’चे अध्यक्ष अमित कोरे हे १० मार्चला जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे हा कारखाना ‘शिवशक्ती’ला भाडेतत्त्वावर देण्याबाबत या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
परवाना धोक्यात
शुगरकेन कंट्रोल आॅर्डरनुसार पाच हंगाम कारखाना बंद राहिला, तर कारखान्याचा परवाना रद्द होऊन तिथे दुसऱ्या कारखान्याला परवानगी देता येते. ‘दौलत’ गेले चार हंगाम बंद असल्याने ३० सप्टेंबर २०१६ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची साखर उत्पादित होणे गरजेचे आहे, अन्यथा परवाना धोक्यात येऊ शकतो.