गुड न्यूज : पन्हाळगडावर बसणार शिवस्नुषा ताराराणींच्या शौर्यगाथेचा लेख
By संदीप आडनाईक | Published: January 1, 2024 01:18 PM2024-01-01T13:18:26+5:302024-01-01T13:19:03+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : जेथे स्वराज्याची राजधानी होती त्या शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा ...
संदीप आडनाईक
कोल्हापूर : जेथे स्वराज्याची राजधानी होती त्या शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती ताराराणी यांची शौर्यगाथा मांडणारा कोरीव लेख पन्हाळा गिरीस्थान नगरपालिका नव्या वर्षात बसवणार आहे.
ज्येष्ठ इतिहासकार व ताराराणींचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतन माळी, पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या प्रयत्नातून ही प्रदीर्घकाळ टिकणारा कोरीव लेख पन्हाळगडावरील ताराराणींच्या राजवाड्यासमोर लवकरच विराजमान होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष निधीची उपलब्धता करण्याचे नियोजन आहे.
छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी (जन्म : १४ एप्रिल १६७५, मृत्यू : ९ डिसेंबर १७६१) अवघ्या २५ वर्षांच्या असताना औरंगजेबाच्या मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या. त्यांनी औरंगजेबासारख्या मुत्सदी, मुघल सम्राटाशी सलग साडेसात वर्षे लढा दिला. पन्हाळगडावर त्यांनी १७०५ मध्ये राजधानी बनविली आणि राज्य कारभार केला. त्याची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आणि ठिकाणे पन्हाळ्यावर आजही पाहायला मिळतात. पन्हाळा गिरीस्थान नगरपालिका आणि पन्हाळा विद्यामंदिर ज्या जागेत आहे, ती वास्तू ताराराणींचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या राजवाड्यासमोरच पन्हाळावासीयांकडून त्यांच्या सन्मानार्थ हा कोरीव लेख बसविण्यात येत आहे.
डॉ. पवार यांनी या कोरीव लेखासाठी १५ ते २० ओळींचे प्रेरणादायी लिखाण केले आहे. यावर नेमक्या शब्दांत ताराराणींची कर्तबगारी मांडण्यात येणार आहे. त्यात ताराराणींबद्दल स्वराज्याचा शत्रू असलेल्या व्यक्तींच्या उद्गारापासून कवी देवदत्त, कवी गोविंद आदींच्या कवितांचा समावेश आहे. मराठ्यांचा कट्टर शत्रू, औरंगजेबाचा चरित्रकार खाफीखान, भीमसेन सक्सेना याने काढलेले गौरवाद्गार, अलीकडच्या काळातील मराठा इतिहासाचे अभ्यासक आणि अमेरिकेतील ऍरिझोना विद्यापीठात प्राध्यापक डॉ. रिचर्ड मॅक्सवेल इटन यांचे मत यांचा समावेश या कोनशिलेवर असणार आहे.
महाराणी ताराराणी यांनी कमी वयात अभूतपूर्व संघर्ष करत स्वराज्याचे रक्षण केले. करवीरसारख्या छोट्याशा राज्याची एक राणी सलग ७ वर्षे जगातील बलाढ्य सम्राट औरंगजेबाशी लढा देते असे उदाहरण जगाच्या इतिहासात अन्यत्र नाही, तिची बरोबरी करणारे जगाच्या इतिहासात कोणीही झालेले नाही, यावर जगप्रसिद्ध इतिहासकार डॉ. इटन यांनी शिक्कामोर्तब केले आहे. -डाॅ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक