Kolhapur- शिये बालिका अत्याचार प्रकरण: फॉरेन्सिककडून अहवालानंतर दोषारोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 04:07 PM2024-08-29T16:07:17+5:302024-08-29T16:08:11+5:30
तपासासाठी बिहारला पथक पाठविणार, दोघांचाही गुन्ह्यात सहभाग
कोल्हापूर : शिये (ता. करवीर) येथील परप्रांतीय दाम्पत्यांच्या मुलीवर निर्घृण अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या माहितीसाठी पोलिसांचे एक पथक बिहारला जाणार आहे. गुन्ह्यात दोन्ही संशयितांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.
फॉरेन्सिक अहवालानंतर या गुन्ह्यात नेमका कोणी लैंगिक अत्याचार केला आहे, हे उघड होणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. संशयित दोघांनी केलेल्या अत्याचाराचे ठोस पुरावे पोलिसांना मिळाले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक अहवालानंतरच या गुन्ह्याचा सविस्तर तपास होणार आहे.
दोघेही संशयित बिहार राज्यातील असून दुसरा संशयित शेजारील जिल्ह्यातील आहे. फॉरेन्सिक अहवालानंतर दोघा संशयितांवर भक्कम पुरावे गोळा केले जात आहेत. त्याबाबत पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, तपास अधिकारी, विशेष तपास पथकाने संशयितांकडे कसून चौकशी केली आहे. त्यामध्ये दोघांनीही गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे.
वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल मिळाल्यानंतरच संशयितांवर दोषारोप दाखल केला जाणार आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाने एकाच वेशातील सहा जणांकडे कसून चौकशी केली. त्यात घडलेल्या घटनेच्या ठिकाणाहून एक संशयित विरुद्ध बाजूने शेताकडून बाहेर पडला आहे. त्या दोघांच्या विरोधातही दोषारोप दाखल होणार असल्याचेही वरिष्ठांनी सांगितले.
दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेला दुसरा संशयित हा १९ वर्षांचा असून बिहारी मजूरच आहे. शिये परिसरातच तो राहतो. पीडित मुलीवर अत्याचार करण्यापूर्वी तिचा गळा दाबून एक डोळाही बाहेर काढल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली असून गुन्ह्यात वापरलेल्या हत्याराचा शोध सुरू केला आहे.
अश्लील व्हिडीओ सापडले
पोलिसांनी केलेल्या तपासात पहिल्या संशयिताला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. त्याला अशी विकृती असल्याचे तपासात उघड होत आहे. या विकृतीतून त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट होत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुसरा सापडला
ताब्यात घेतलेला दुसरा संशयित हा बिहारी आहे. तपासात पोलिसांनी या परिसरातील अनेक सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यामध्ये सहा जणांवर पोलिसांचा संशय बळावला. त्यातील दिव्यांग असलेल्या एकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यामध्ये त्याने या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याचीही वैद्यकीय तपासणी केली आहे.
वयाच्या पुराव्याचा शोध
तपासात पीडित मुलीच्या घरात काहींची आधार कार्ड नाहीत. त्यामुळे त्यांचे नेमके वय किती होते, याचा शोध घेतला जाणार आहे. वयाची नोंद शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक बिहारकडे रवाना होणार आहे. पीडित मुलीचा जन्म ज्या दवाखान्यात झाला. तेथून जन्मतारखेची नोंद घेतली जाईल.
दुसऱ्या दिवशी जाऊन मृतदेह पाहिला
पोलिसांनी ताब्यात घेतलेला दुसऱ्या संशयिताने त्या पीडितेवर अत्याचार केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटनेच्या ठिकाणी जाऊन तिचा मृतदेह पाहिला. परिसरात तो दहा ते पंधरा मिनिटे घुटमळला, असल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे.