शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी शोभायात्रा
By admin | Published: January 22, 2016 11:20 PM2016-01-22T23:20:27+5:302016-01-23T01:00:01+5:30
समितीचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर : बैलगाडी शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठवावी यासाठी अखिल भारतीय शेतकरी शर्यत बचाव संघर्ष कृती समिती व पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शाहू बैलगाडी रेसिंग असोसिएशनतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शोभायात्रा काढण्यात आली. ‘बैल आमचा जीवनसखा’, ‘स्थगिती अडथळा शर्यत आम्हीच जिंकू’, ‘पेटा हटवा...ग्रामीण संस्कृती वाचवा’, ‘पेटा हटवा व प्राणी वाचवा’ असे फलक घेतलेले बैलगाडी शर्यतशौकीन लक्ष वेधत होते.
दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौक येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. प्रसाद धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखालील ही शोभायात्रा व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निघाली. यामध्ये बैलगाड्यांसह शर्यतशौकीन शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत शांततेच्या मार्गाने शोभायात्रेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाद्वारे केंद्र सरकार व सर्वाेच्च न्यायालयाला योग्य बाजू मांडण्याची भूमिका असल्याचे सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
आंदोलनात नारायण गाडगीळ, अरुण टोपकर, रितेश तिवले, शिवाजी पाटील, रंगराव ढेरे, बाळासाहेब शेख, सचिन मोरे, संजय हजारे, भारत गायकवाड, युवराज पाटील, अनिल निकम, सुधीर खाडे, पांडुरंग खानविलकर, तानाजी बंडगर, विजय काळे, धनपाल पोमाजे, मधु पाटील, राजू गंगाधरे, जयसिंग देसाई, श्रीकांत गावडे, दाजी पाटील, राजदीप थोरात, आदी सहभागी झाले होते.