सतेज पाटील गटाला धक्का, राजाराम कारखान्याचे १८९९ सभासद वैधच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 11:24 AM2023-03-08T11:24:53+5:302023-03-08T11:25:29+5:30

१८९९ सभासदांवर विरोधी सतेज पाटील गटाने आक्षेप नोंदवलेला होता

Shock to Satej Patil group, 1899 members of Rajaram Factory are valid | सतेज पाटील गटाला धक्का, राजाराम कारखान्याचे १८९९ सभासद वैधच

सतेज पाटील गटाला धक्का, राजाराम कारखान्याचे १८९९ सभासद वैधच

googlenewsNext

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १८९९ सभासद वैधच असल्याचा निकाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी सोमवारी दिला. हा कारखाना महाडिक यांच्याकडून काढून घ्यायचा यासाठी प्रयत्नशील असलेल्या माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाला हा धक्का मानला जातो.

मतदार यादीवर दोन्ही बाजूने हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवर प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर विभाग यांच्यासमोर एक मार्चला सुनावणी झाली. त्यावेळी दोन्ही बाजूनी आपले मत मांडले होते. यामध्ये १८९९ सभासदांवर विरोधी सतेज पाटील गटाने आक्षेप नोंदवलेला होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्रादेशिक सहसंचालकांनीही पुन्हा एकदा हा आक्षेप फेटाळून लावले व हे सभासद निवडणुकीत मतदानास पात्र झाल्याने हा मोठा धक्का मानला जातो. 

विरोधी आघाडीकडून शौमिका महाडिक यांच्या संस्था गटातील ठरावाबाबत नोंदवलेला आक्षेपही प्रादेशिक सहसंचालकांनी फेटाळून लावला. राजाराम कारखाना निवडणुकीच्या वाढीव सभासदांचा प्रश्र्न चांगलाच गाजला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी सभासदांचे हक्क अबाधित ठेवले होते. त्यानंतर पुन्हा विरोधी आघाडीने याच सभासदांवर आक्षेप घेतल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.

ज्या पद्धतीने सप्तगंगा साखर कारखान्याचे पाच हजार सभासद एका रात्रीत कमी केले आणि तिथला सहकार संपवून टाकला, त्याच पद्धतीने राजाराम कारखान्यातही सभासद कमी करून सत्ता घ्यायची आणि सहकार संपवायचा, असाच आमच्या विरोधकांचा कुटिल डाव होता, पण तो न्यायालय व सहकार खात्याने उधळून लावला. आमच्या लढ्याला आज पुन्हा एकदा यश आले. निःपक्षपाती निर्णयासाठी कारखान्याच्या सर्व सभासदांच्यावतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांचे आभार मानतो. - अमल महाडिक, छत्रपती राजाराम कारखाना सत्तारूढ आघाडीचे नेते.

सभासद संख्येबद्दल दावे-प्रतिदावे

महाडिक गटाने १८९९ सभासद पात्र झाल्याचे म्हटले असले, तरी त्यास सतेज पाटील गटाने हरकत घेतली आहे. महाडिक गटाने मुद्दाम हा आकडा फुगवून व्हायरल केला असल्याचे पाटील गटाचे म्हणणे आहे. त्यांच्या मते आम्ही कारखान्याच्या ९९८ सभासदांविरोधात हरकत घेतली होती. तेवढ्याच सभासदांना प्रादेशिक साखर सहसंचालकांनी वैध ठरवले आहे. असे असताना हे १८९९ सभासद आले कोठून? अशी विचारणा केली जात आहे.

Web Title: Shock to Satej Patil group, 1899 members of Rajaram Factory are valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.