धक्कादायक आघाड्यांचा निकाल ‘धक्कादायक’
By admin | Published: March 30, 2016 01:38 AM2016-03-30T01:38:48+5:302016-03-30T01:39:11+5:30
गडहिंग्लज साखर कारखाना निवडणूक : दोन्ही आघाड्यांमध्ये काट्याची टक्कर ; चुरशीचा निकाल जाहीर
गडहिंग्लज : हरळी बुद्रूक (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या इतिहासात यावेळी झालेल्या धक्कादायक आघाड्यांचा निकालही धक्कादायक लागला. निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी विजयाचा दावा केला असताना निकाल मात्र धक्कादायक व संमिश्र राहिल्याचे गटनिहाय निकालावरून स्पष्ट झाले.
आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर व सतेज पाटील आणि माजी अध्यक्ष व माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे आणि संग्रामसिंह नलवडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडी आणि माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर व विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, हत्तरकी गट आणि भाजप-सेना युतीचे काळभैरी शेतकरी पॅनेल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पॅनेल अशी तीन पॅनेल रिंगणात होती. मात्र, ‘शेतकरी’ व ‘काळभैरी’ यांच्यातच दुरंगी चुरशीची लढत झाली.
रविवारी चुरशीने झालेल्या निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले. त्याचवेळी संमिश्र कौल मिळण्याचे संकेत मिळाले होते. १९ जागांसाठी तीन प्रमुख पॅनेलसह ३० अपक्ष मिळून तब्बल ८७ उमेदवार रिंगणात होते. ऊस उत्पादक गटातील एकूण २३,९२४ पैकी १९,०४१ सभासदांनी, तर संस्था गटातील १८८ पैकी १८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मंगळवारी येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये सकाळी ८ वाजता ९८ टेबलांवर केंद्रनिहाय मतमोजणीला सुरुवात झाली.
सकाळी साडेआठच्या सुमारास संस्था गटातील पहिला निकाल हाती आला. त्यात शहापूरकर पॅनेलच्या सदानंद हत्तरकी यांनी बाजी मारली. त्यापाठोपाठ कौलगे-कडगाव गटातून स्वत: डॉ. शहापूरकर व अनंत कुलकर्णी यांनी बाजी मारली. त्यामुळे शहापूरकरांच्या समर्थकांनी जल्लोष केला. दरम्यान, गडहिंग्लज-हनिमनाळ गटातून शिंदे-मुश्रीफ पॅनेलच्या संग्रामसिंह नलवडे, विद्यमान संचालक बाळासाहेब मोरे यांनी बाजी मारली. त्यापाठोपाठ भडगाव-मुगळी गटातून अमर चव्हाण व सतीश पाटील यांनी बाजी मारली, तर ‘काळभैरी’चे प्रकाश चव्हाण यांनाही पुन्हा संधी मिळाली.
नूल-नरेवाडी गटातून माजी अध्यक्ष शिंदे हे एकमेव विजयी झाले, तर ‘काळभैरी’मधून सुभाष शिंदे व विद्यमान संचालक किरण पाटील विजयी झाले. महागाव-हरळी गटात शिंदे-मुश्रीफ आघाडीचे विद्यमान संचालक प्रकाश पताडे यांच्यासह दीपक जाधव व विद्याधर गुरबे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भू-संपादन) संजय पवार, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार हणुमंत पाटील, सहायक निबंधक ए. एच. भंडारी व धनंजय पाटील यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
‘दादां’ची पिछाडी...मुश्रीफांची बाजी
तीन वर्षांपासून आमदार मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय महाआघाडी रिंगणात उतरविण्यासाठी सहकारमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला होता. माजी अध्यक्ष शहापूरकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील व हत्तरकी गट यांच्यासह भाजप व शिवसेनेची मोट बांधण्यात त्यांना यश मिळाले. मात्र, वैयक्तिक मतभेदातून शिंदे व शहापूरकरांचे बिनसले. त्यामुळे शिंदे व मुश्रीफ एकत्र आले. मुश्रीफांपासून फारकत घेतलेले विद्यमान उपाध्यक्ष चव्हाण यांनी शहापूरकरांना साथ दिली. चंद्रकांतदादा व मुश्रीफ या दोघांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्यामुळे सामना चुरशीचा झाला. त्यात मुश्रीफांनीच बाजी मारली. जिल्हा बँक, बाजार समिती, जिल्हा शेतकरी संघ व महानगरपालिकेप्रमाणेच गडहिंग्लज कारखान्यातही ‘दादा’ पिछाडीवरच राहिले.
काका-पुतणे विजयी... भावाचा पराभव!
भडगाव-मुगळी गटात माजी सभापती अमर चव्हाण यांनी आपले सख्खे चुलते व विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण आणि सख्खा भाऊ उदयसिंह यांच्या विरोधात निकराची लढत दिली. यामध्ये प्रकाशराव व अमर यांचा विजय झाला, तर उदयसिंह पराभूत झाले.
‘स्वाभिमानी’ची पाटी कोरीच!
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दहा वर्षांपासून संघर्ष करून सभासदांकडे स्वतंत्रपणे कौल मागितलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकही जागा मिळाली नाही. निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या ‘स्वाभिमानी’ची पाटी कोरीच राहिली.
‘सदानंद’ एक मताने विजयी
संस्था गटात सदानंद हत्तरकी व मनोहर पाटील यांच्यातही काट्याची टक्कर झाली. यामध्ये हत्तरकी यांनी अवघ्या एका मताने बाजी मारली. जिल्हा परिषद व ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या अंगावर पहिल्यांदाच गुलाल पडला. त्यांना ९४ तर पाटील यांना ९३ मते मिळाली.
‘महागाव-हरळी’ गटातून विजयी घोडदौड
कार्यक्षेत्रातील पहिल्या चार गटांतील निकाल ५-५ असा समान राहिला. मात्र, महागाव-हरळी गटातील तिन्ही जागा जिंकल्यामुळे ८-५ अशी शेतकरी आघाडीची विजयी घोडदौड सुरू झाली.
‘शिंदें’चा षटकार..‘चव्हाणां’चा चौकार..!
१९८८ पासून आजअखेर झालेल्या कारखान्याच्या सलग सहा निवडणुकीत विजयी होऊन ‘विजयाचा षटकार’ मारण्याचा विक्रम अॅड. शिंदे यांनी या निवडणुकीत नोंदविला, तर २००० पासून आजअखेर झालेल्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयी होऊन प्रकाश चव्हाण यांनी विजयाचा चौकार मारला.