शॉटकट मार्गामुळे बॉक्साईट वाहतूक झाली अडचणीची
By admin | Published: May 27, 2014 07:37 PM2014-05-27T19:37:17+5:302014-05-27T19:37:34+5:30
कसबा तारळेतील ग्रामस्थ संतप्त : आंदोलनाचा इशारा
कसबा तारळे : राधानगरी तालुक्यातील हिंडाल्को माईन्स येथून बॉक्साईटची वाहतूक करणार्या अनेक ट्रकची कसबा तारळे, गुडाळ, खिंडी-व्हरवडे गावांतून वर्दळ सुरू आहे. या मार्गावर लहान-मोठे अपघातही घडले आहेत. या संदर्भात कंपनीच्या अधिकार्यांना सांगूनही वाहतूक मार्गात बदल झालेला नाही. याबाबत कंपनीने तत्काळ दखल न घेतल्यास ‘रास्ता रोको’चा इशारा धनंजय महाडिक युवा शक्तीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी दिला आहे. दुर्गमानवाड पैकी पडसाळी येथून हिंडाल्को कंपनीची बॉक्साईट वाहतूक बेळगाव येथे सुरू आहे. यासाठी दिवसभरात २५० ते ३०० ट्रक वाहतूक करीत आहेत. ही वाहतूक माईन्सपासून दुर्गमानवाड, पिरळ, राधानगरी, गैबी तिट्टा, सरवडे, निपाणीमार्गे बेळगाव अशी सुरू आहे. परंतु वाहतूक करणारे शंभरच्या वर ट्रक अंतर व वेळ वाचविण्यासाठी कसबा तारळे, गुडाळ, खिंडी व्हरवडेमार्गे अकनूर, मुधाळ तिट्टा या गावांतून वाहतूक करीत आहेत. यातील अनेक ट्रक हे वरील गावातील आहेत; त्यामुळे गावातून जाण्यासाठी किंवा वेळ व अंतर वाचविण्याच्या उद्देशाने ते वाहतूक करीत आहेत. गावातील रस्ते अरुंद असून रहदारी जास्त आहे. त्यात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातही झालेले आहेत. ग्रामस्थांनी व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु स्थानिक ट्रकचालक किंवा मालकांनी याची दखल घेतली नसल्याने वादावादीचे प्रसंगही घडले आहेत. कंपनीचे कर्मचारीही वाहतूक मार्गावर जाणार्या-येणार्या ट्रकचे नंबर नोंद करून घेत आहेत; पण त्यावरही काही मर्यादा येत आहेत. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनाही लेखी निवेदन देण्यात आले आहे. यानंतर वाहतूक एक-दोन दिवस सुरळीत होते. परत ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे होत आहे.