Hasan Mushrif ED Raid: सारखं येऊन त्रास देण्यापेक्षा आम्हाला गोळ्या झाडा; हसन मुश्रीफांच्या पत्नीची संतप्त भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 11:33 AM2023-03-11T11:33:52+5:302023-03-11T11:41:36+5:30
कागलमध्ये तणावाची परिस्थिती
जहांगीर शेख
कागल : ईडीला सांगा सारख येऊन आम्हाला त्रास देण्यापेक्षा आम्हाला गोळ्या झाडा अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांना अश्रुही अनावर झाले. निवासस्थाना समोर गेट जवळ येऊन त्यानी माध्यमासमोर भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा शितल फराकटे यांनी सांगितले की, घरी कोणी पुरूष नाही. लहान मुले व महिला आहेत. मुलांना ताप आहे आणि ईडीचे अधिकारी अरेरावी करीत आहेत. सीआरएफच्या महिला पोलिसांनी सायरा मुश्रीफ यांना घरात जाण्यास सांगितले. यावेळी भैय्या माने व अन्य कार्यकर्त्यांनी सायरा मुश्रीफ यांना आम्ही सर्वजण मुश्रीफ साहेबांच्या सोबत असल्याचा शब्द दिला.
कागलमध्ये तणावाची परिस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. दीड महिन्यांत तिसऱ्यांदा ईडीने छापेमारी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक असून कागलमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुश्रीफांवर २४ एप्रिलपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश
विशेष म्हणजे शुक्रवारीच उच्च न्यायालयाकडून हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या या कारवाईने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. मुश्रीफांवर २४ एप्रिलपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत; तर न्यायालयाने भाजपा नेते किरीट सोमय्या यांनाही झटका देत फसवणूकप्रकरणी कोल्हापूर न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्यावर कारवाई सुरू करण्याच्या दिलेल्या आदेशाची प्रत सोमय्या यांच्या हाती कशी आली? याची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने शुक्रवारी दिले.
सारखं येऊन त्रास देण्यापेक्षा गोळ्या झाडा, हसन मुश्रीफांच्या पत्नी संतप्त #HasanMushriff#EDpic.twitter.com/Rl2DfxlbOo
— Lokmat (@lokmat) March 11, 2023