सख्ख्या भावाचा पणोरे येथे गोळी घालून खून
By admin | Published: May 31, 2016 01:11 AM2016-05-31T01:11:27+5:302016-05-31T01:18:26+5:30
दुसरा भाऊ गंभीर : आरोपीस खेरीवडेत बंदुकीसह अटक
कळे/म्हासुर्ली : पणोरे (ता. पन्हाळा) येथे किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत महावितरणचा कर्मचारी बाळू ज्ञानू घाग (वय ५५) याने सख्ख्या भावाचा गोळी घालून खून केला. पांडुरंग ज्ञानू घाग (४७) असे मृत भावाचे नाव असून, संभाजी
ज्ञानू घाग (४३) या भावाच्या डोक्याला गोळी घासून गेल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री उशिरा
ही घटना घडली. खून केल्यानंतर पलायन केलेल्या आरोपीस सोमवारी सकाळी आठच्या सुमारास खेरीवडे (ता. गगनबावडा) येथे शिताफीने बंदुकीसह पोलिसांनी अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पणोरे येथील बाळू घाग हा महावितरणमध्ये बाजार भोगाव (ता. पन्हाळा) येथे वायरमन म्हणून काम करतो. गेल्या काही वर्षांपासून तो दारूच्या नशेत गावातील गवत, पिंजार, आदींच्या गंज्या पेटवत असे. तसेच अनेकांना किरकोळ कारणावरून शिव्या देऊन भांडण करून दहशत माजवत होता. त्यातून त्याने अनेकांना मारहाण, तसेच चाकूहल्लेही केले होते. याबाबत गावकऱ्यांनी त्याला समज देऊन मारहाणही केली होती. तसेच पोलिसांतही तक्रारी केल्या होत्या. मात्र, घरचे, नातेवाईक मध्यस्थी करून प्रत्येक वेळी त्यास वाचवत होते. दरम्यान, दिवसेंदिवस त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत होती. तो नेहमी चाकू, सुरा, आदी हत्यारांसह मिरचीपूड, बंदुकीची काडतुसे आपल्या बॅगेत घेऊन फिरत असे. दारूच्या नशेत गावातील काही प्रतिष्ठित लोकांची नावे घेऊन त्यांना ठार मारण्याची भाषा करत असे. त्यामुळे गावात त्याची मोठी दहशत पसरली होती. सहसा त्याच्या नादास कोण लागत नसत. शिकारीचा नाद असल्यामुळे परवाना नसतानाही तो बंदूक वापरत होता. चार-पाच दिवसांपूर्वी गावातीलच एका व्यक्तीबरोबर त्याचा वाद झाला होता. त्या व्यक्तीने त्याचा बंदोबस्त कसा करायचा, याबद्दल गावसभा घेतली होती. त्या सभेला त्याचे दोन्ही भाऊ हजर होते. तेव्हा त्यांंनी आपल्या भावाच्या विरोधात भूमिका घेऊन गावकऱ्यांना पाठिंबा दिला होता. त्याचा राग बाळूच्या मनात होता. त्या दिवसापासून तो अस्वस्थ होता. रविवारी सायंकाळी त्याने जर्गी (ता. गगनबावडा) येथील मित्राची बंदूक, तसेच काडतुसे आणली होती. त्यानंतर तो गावातील लोकांना ठार मारणार असल्याचे सांगत होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घराच्या मागील दारावर कोणीतरी लाथा-बुक्क्या मारत असल्याचे घरातील लोकांच्या लक्षात आले.
तेव्हा त्याची पुतणी अनिता हिने दार उघडले. दार उघडताच त्याने तिला बाजूला ढकलून घरात प्रवेश केला. यावेळी त्याने आपल्या भावास झोपेतून उठवून, ‘चार दिवसांपूर्वी तुम्ही ग्रामस्थांच्या बैठकीत माझ्या विरोधात बोललात. तुम्ही मला गावात दादागिरी करायला मदत करत नाही, म्हणून मी तुला ठार मारणार आहे’, असे म्हणून घरातील लहान मुले व नातेवाइकांसमोरच पांडुरंग यांच्या पोटावर अवघ्या काही फुटांवरून गोळी झाडली. त्याचवेळी दुसरा भाऊ संभाजी आवाजाने जागे होऊन घटनास्थळी गेले असता त्यांच्यावरही त्याने गोळी झाडली. मात्र, संभाजी यांच्या डोक्यास गोळी घासून गेल्यामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. एवढा गंभीर प्रकार घडूनही त्याच्या दहशतीमुळे एकही नागरिक घटनास्थळी फिरकला नाही. मृत व जखमींना मदत न मिळाल्याने सुमारे तीन तास ते जाग्यावरच पडून होते. अखेर अनिताने धुंदवडे (ता. गगनबावडा) येथील पाहुण्यांना फोन करून बोलावून घेतले. या दरम्यान बराच वेळ गेला; अन्यथा त्यांचा जीव वाचला असता. रात्री उशिरा नातेवाइकांनी येऊन मृत व जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारापूर्वीच पांडुरंग यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गोळीबारानंतर घरच्या लोकांनी आरडाओरड करताच आरोपी जंगलात पळून गेला. त्याच्यासोबत त्याचा सहकारी गुंडू सखाराम पाटील होता. नंतर बाळू पुन्हा गावच्या दिशेने परत आला होता. या घटनेची फिर्याद अनिता पांडुरंग घाग हिने कळे पोलिसांत दिली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
वेळीच कारवाई केली असती तर...
सात-आठ दिवसांपूर्वी त्याने गावातील एका युवकावर चाकूहल्ला केला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी बैठक घेऊन पोलिसांना त्यास पकडण्याची विनंती केली होती. यावेळी कळेच्या पो.नि. मीना जगताप यांना बैठकीस येण्याची विनंती करून कारवाईची मागणी केली होती; मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. वेळीच कारवाई केली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती.
वाचविण्याच्या नादात भावानेच गमावले प्राण
आरोपी हा सुरुवातीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा, शिकारीच्या व व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यातून त्याने अनेक गुन्हे केले होते. ग्रामस्थ कारवाई करण्यास लागले की, त्याचे भाऊ ग्रामस्थांना विनंती करून कारवाई थांबवत असत व प्रत्येक वेळी त्यास पाठीशी घालत असत. प्रत्येकवेळी त्यास वाचविले; मात्र वाचविण्याच्या नादात भावानेच आपले प्राण गमावले.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
या घटनेमुळे संपूर्ण धामणी खोऱ्यात खळबळ उडाली असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. सोमवारी दुपारी मृत पांडुरंग यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून, गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
पोलिसांवरच रोखली बंदूक
या घटनेची माहिती मिळताच कळे पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मीना जगताप, राधानगरीचे पोलिस निरीक्षक अनिल गाडे, पन्हाळ्याचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी हे फौजफाट्यासह पणोरे येथे दाखल झाले.
रविवारी रात्रभर ते आरोपींच्या शोधात होते. पो. हे. कॉ. यादव यांनी बळपवाडी येथे पोलिसमित्रांसह आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपीने त्यांनाही गोळी घालून ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावरच १२ बोअरची बंदूक रोखली.
अखेर घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापुरातून पोलिसांची जादा कुमक बोलाविण्यात आली. त्यांनी सर्व परिसर पिंजून काढल्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कळे पोलिसांनी बाळू याला खेरीवडे (ता. पन्हाळा) येथे एस.टी.तून जाताना पकडून ताब्यात घेतले.