नेमबाज राही सरनोबत हिची ‘सुवर्ण’ कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:53+5:302021-06-29T04:17:53+5:30

टोकियो येथे २२ जुलैपासून ऑलिम्पिंक स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये सहभागी होणारे विविध ९० देशांतील नेमबाजपटू या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक ...

Shooter Rahi Sarnobat's 'golden' performance | नेमबाज राही सरनोबत हिची ‘सुवर्ण’ कामगिरी

नेमबाज राही सरनोबत हिची ‘सुवर्ण’ कामगिरी

Next

टोकियो येथे २२ जुलैपासून ऑलिम्पिंक स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये सहभागी होणारे विविध ९० देशांतील नेमबाजपटू या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दि. २२ जूनपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत भारताने एक रौप्य आणि दोन कास्यपदकांची सोमवारपर्यंत कमाई केली होती. ‘सुवर्णकन्या’ राही हिने या स्पर्धेत सुरूवातीपासून आघाडी घेत २५ मीटर पिस्तूल प्रकारामध्ये ५९१ गुणांची कमाई करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. अंतिम फेरीमध्ये तिने ४० पैकी ३९ गुण मिळविले. तिने या फेरीसह तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या फेरीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिने पात्रता फेरीमध्ये २९६, तर रविवारी २९५ गुण मिळविले होते. दरम्यान, राहीच्या यशस्वी कामगिरीनंतर तिच्यावर आणि कुटुंबीयांवर दूरध्वनीव्दारे आणि सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव झाला. राजारामपुरीतील निवासस्थानी सरनोबत कुटुंबियांनी दुपारी तीन वाजता लॅपटॉप, स्मार्टफोनव्दारे राहीची अंतिमफेरीतील कामगिरी पाहिली. तिने सुवर्णपदक पटकविल्यानंतर कुटुंबीयांनी एकमेकांना साखर-पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी आजी वसुंधरा सरनोबत, वडील जीवन, आई प्रभा, काका राजेंद्र, काकी कुंदा, भाऊ आदित्य, अजिंक्य, वाहिनी धनश्री यांच्यासह अर्चना सावंत, शिवाजीराव सावंत, भरत कदम, नामदेवराव शिंदे, राजेंद्र इंगळे, शौर्यवीर सरनोबत उपस्थित होते.

चौकट

‘राही’ ऑलिम्पिंकमध्ये दमदार कामगिरी करेल

कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून क्रोएशिया येथे राहीचा ऑलिम्पिंकमध्ये सराव सुरू आहे. आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील तिची कामगिरी खूप दमदार झाली आहे. जागतिक विक्रमाने तिला एका गुणाने हुलकावणी दिली आहे. ऑलिम्पिंकमध्ये २८ जुलै रोजी तिची स्पर्धा होणार आहे. तिचा सध्याच्या फॉर्म कायम राहिल्यास ती निश्चितपणे ऑलिम्पिंकमध्ये दमदार कामगिरी करेल, असा विश्वास तिचे भाऊ आदित्य सरनोबत यांनी सोमवारी व्यक्त केला.

चौकट

अन्य खेळाडूंची कामगिरी

या स्पर्धेत मनू भाकर ही सातव्या क्रमांकावर राहिली. तिला ५८८ गुण मिळाले. रॅपिड फायर राऊंडमध्ये २९६ गुणांची कमाई केल्यानंतर ती तिसऱ्या क्रमाकांवर पोहोचली होती. सौरभ चौधरी याने सांघिक दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये रौप्यपदक मिळविले. तिने राही आणि यशस्विनी देसवाल यांच्यासह दहा मिटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारामध्ये कास्यपदक मिळविले होते. पुरूष एकेरी दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात कास्यपदकाची कमाई केली. २५ मीटर पिस्तूल प्रकारामध्ये मथिल्डे लामोले (फ्रान्स) याने ३१ गुणांसह रौप्यपदक,तर रशियाच्या विन्टालिना हिने २८ गुणांसह कास्यपदक मिळविले.

फोटो (२८०६२०२१-कोल-राही सरनोबत ) : आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आणि कोल्हापूरची ‘सुवर्णकन्या’ राही सरनोबत हिने क्रोएशिया येथील ओसीजेकमधील आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करत सोमवारी बाजी मारली.

फोटो (२८०६२०२१-कोल-सरनोबत कुटुंबीय ) : कोल्हापुरात सोमवारी राजारामपुरीतील निवासस्थानी सरनोबत कुटुंबीयांनी दुपारी तीन वाजता लॅपटॉप, स्मार्टफोनव्दारे राहीची अंतिम फेरीतील कामगिरी पाहिली. तिने सुवर्णपदक पटकविल्यानंतर या कुटुंबीयांनी एकमेकांना साखर-पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

Web Title: Shooter Rahi Sarnobat's 'golden' performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.