दुकानदार, व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, निर्बंध हटवले जाणार नाहीत : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 09:12 PM2021-06-25T21:12:38+5:302021-06-25T21:16:04+5:30
CoronaVIrus Kolhapur : कोल्हापुरात पॉझिटीव्ह रेट जास्त असल्याने जिल्ह्याचा स्तर ४ मध्ये समावेश आहे, त्यामुळे शहरावरील निर्बंध हटणार नाहीत, व्यापारी व दुकानदारांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले आहे, यावेळीही करावे असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले शुक्रवारी केले. व्यावसायिकांच्या नुकसानीची आम्हाला कल्पना असून काही पॅकेज देता येते का यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
कोल्हापूर : कोल्हापुरात पॉझिटीव्ह रेट जास्त असल्याने जिल्ह्याचा स्तर ४ मध्ये समावेश आहे, त्यामुळे शहरावरील निर्बंध हटणार नाहीत, व्यापारी व दुकानदारांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले आहे, यावेळीही करावे असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले शुक्रवारी केले. व्यावसायिकांच्या नुकसानीची आम्हाला कल्पना असून काही पॅकेज देता येते का यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
राज्यातील अन्य शहरांमध्ये अनलॉक झाले आहे, मात्र कोल्हापुरात पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यवसायांना दुपारी चारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना घाईघाईने निर्बंध हटवू नका, अशी सूचना केली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी मात्र सोमवारपासून आम्ही दुकाने सुरू करणार प्रशासनाने कारवाई केली तरी चालेल असा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभुमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यावसायिकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
ते म्हणाले, गेले दीड वर्षे परिस्थिती अतिशय वाईट आहे. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्यावर अन्याय झाला आहे याची आम्हाला जाणीव आहे. सध्या चाचण्या वाढवल्याने पॉझिटिव्ह रुग्णदेखील जास्त येत आहेत. पण संसर्ग कमी करण्याचा हाच उपाय आहे. गुरुवारी पुन्हा दोन हजार रुग्ण आढळले आहेत. पण पूर्वी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १० टक्के होता तो आता ६ टक्क्यांवर आला असून सध्या ९ हजारावर सक्रिय रुग्ण आहेत.
व्यावसायिकांना पॅकेज देण्याचा विचार करू पण शासनच सध्या खूप अडचणीत आहे, केंद्राने राज्याचे थकलेले ३० हजार कोटी रुपये अजून दिलेले नाहीत. कोणती मदत दिलेली नाही, तोक्ते चक्रीवादळ येवून गेल्यावरदेखील मदत दिली नाही दुसरीकडे त्यांनी गुजरातला १ हजार कोटीची मदत केली. केंद्र सरकारदेखील आमची परीक्षा घेत आहे. गेली दीड वर्षे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार, आशासेविका असे अनेक घटक न थकता काम करत आहेत. पण परिस्थितीच इतकी वाईट आहे की याचा विचार करुन व्यावसायिकांनी सहकार्य करावे.