इचलकरंजीतील दुकाने पुढील पाच दिवस बंदच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:55+5:302021-06-22T04:17:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने गेल्या ७५ दिवसांपासून बंद आहेत. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने गेल्या ७५ दिवसांपासून बंद आहेत. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नगरपालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे व्यापारी व प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात आली. या चर्चेतून व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित करत दुकाने पुढील पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.
शहरातील जवळपास २७ असोसिएशननी दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येईपर्यंत दुकाने बंदच राहणार असल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर व्यापारी व पोलीस प्रशासन यांच्यात बैठक पार पडली. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्याशी दूरध्वनीवरून सखोल चर्चा करण्यात आली. त्यांनी पोलीस प्रशासन आपल्या भूमिकेशी ठाम आहे. उपाययोजनेसाठी आग्रही असल्याने येत्या आठवड्यात संसर्ग दर कमी येऊन आपल्याला सूट दिली जाईल. त्यामुळे ७५ दिवस केलेले सहकार्य वाया जाऊ देऊ नका, असे स्पष्ट केले. आणखी पाच दिवस थांबण्याचे आवाहन केले. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी व्यापाऱ्यांनी थोड्या काळासाठी संयम सोडू नये. चाचण्या वाढवत असून तशी लेखी हमी देत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.