कोल्हापूर शहरातील दुकाने दोन दिवस बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:28+5:302021-06-29T04:16:28+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, सोलापूर शहराच्या धर्तीवर कोल्हापूर आणि इचलकरंजी शहराचे एकत्रित प्रशासकीय युनिट करून येथील सर्व दुकाने ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, सोलापूर शहराच्या धर्तीवर कोल्हापूर आणि इचलकरंजी शहराचे एकत्रित प्रशासकीय युनिट करून येथील सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळविण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाला सादर केला जाईल. ही परवानगी मिळेपर्यंत दोन दिवस संयम राखून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व दुकाने मंगळवारी, बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी, व्यावसायिकांनी घेतला. तसेच या दोन दिवसांत राज्य शासनाकडून परवानगी मिळाली तर ठीक, अन्यथा गुरुवारपासून सर्व दुकाने उघडण्याचा इशारा त्यांनी दिला.
जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळेल, अशी व्यापारी, व्यावसायिकांना अपेक्षा होती. मात्र, जिल्ह्यात अनलॉकच्या चौथ्या स्तरातील निर्बंध कायम राहिल्याने ते शक्य झाले नाही. गेल्या अडीच महिन्यांपासून व्यापार, व्यवसाय बंद आहे. यापुढे दुकाने बंद ठेवणे शक्य नसल्याचे सांगत कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सोमवारी सकाळी नऊ ते चार या वेळेत सुरू करण्याचा निर्णय कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, राजारामपुरी आणि महाद्वार रोड व्यापारी असोसिएशन, जिल्हा सराफ व्यापारी संघाने रविवारी घेत त्यादृष्टीने सर्व व्यापारी, व्यावसायिकांना सूचना केल्या. या निर्णयानुसार सोमवारी सकाळी नऊ वाजता महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीरोड, शाहुपुरी आदी परिसरातील व्यापारी आपल्या दुकानांमध्ये आले. महाद्वार रोड परिसरातील दुकाने उघडण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाचे पथक कारवाईसाठी त्याठिकाणी आले होते. त्याची माहिती मिळताच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड आदी पदाधिकारी तेथे पोहोचले. दुकाने उघडल्यास कारवाई करण्याची भूमिका महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, तर दुकाने सुरू करण्यावर व्यापारी संघटनांचे पदाधिकारी ठाम राहिले. आपापली भूमिका मांडण्यावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन करत व्यापारी संघटनांचे पदाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेतच्या बैठकीला रवाना झाले. या बैठकीतील चर्चेनंतर आणि पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवस अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे आणि राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जाहीर केला.
चौकट
पुन्हा दुकानांची शटर बंद
शहरातील विविध परिसरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने सुरू केली. त्यांच्याकडून दुकानांची साफसफाई करण्यात येत होती. दुपारी दीडच्या सुमारास व्यापारी संघटनांनी त्यांच्या संलग्नित संघटना, सभासदांना दुकाने बंद करण्याचे दूरध्वनीवरून आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत दुपारी दोननंतर व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांची शटर बंद केली.