Coronavirus Unlock :कृषिसाहित्य, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 06:10 PM2020-09-10T18:10:01+5:302020-09-10T18:12:46+5:30
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. या कालावधीत कृषी, बी-बियाणे आणि साहित्य विक्री, औषध दुकाने, दूधविक्रीची दुकाने आणि शहर, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील उद्योग सुरू राहणार आहेत. किराणा-भुसारी, धान्यासह अन्य व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने बंद राहतील.
या कर्फ्यूचा निर्णय कोल्हापूर चेंबरच्या बैठकीत व्यापारी, व्यावसायिकांनी मंगळवारी (दि. ८) जाहीर केला. त्यातील निर्णयानुसार शहरातील कृषी, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहतील. धान्य, मसाला, खाद्यतेल, किराणा-भुसारी, प्लायवूड, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी., ऑटोमोबाईल, आदींशी संबंधित अन्य व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने बंद राहणार आहेत. गुजरी येथील सराफ व्यावसायिकांची दुकानेही बंद राहतील.
या कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्यांना आवश्यक असणारे धान्य, आदी साहित्य सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत खरेदी करावे. व्यापारी, व्यावसायिकांना ॲडव्हान्स टॅक्स भरायचा असल्याने बँका सुरू ठेवण्याची मागणी आम्ही महानगरपालिकेकडे केली असल्याचे कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केले.
नागरिकांनी साथ द्यावी
आपला आणि इतरांचा जीव वाचला, तर व्यवसाय-व्यापार चालणार आहे. ते लक्षात घेऊन शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी या जनता कर्फ्यूचे पालन करावे. नागरिक, ग्राहक सुरक्षित राहावेत या उद्देशाने आम्ही सहा दिवसांचा कर्फ्यू पाळणार आहोत. त्याला नागरिकांनी साथ द्यावी. घरातून बाहेर पडू नये. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी या कर्फ्यूचे कडकपणे पालन करावे, असे आवाहन संजय शेटे यांनी केले.
राजारामपुरीतील दुकाने राहणार सुरू
या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यापारी आणि कामगार वर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. जनता कर्फ्यू करूनही काही व्यवसाय, उद्योग चालू, तर काही व्यवसाय बंद राहतील. अशा प्रकारे उपाययोजना करून कोरोना आटोक्यात येईल, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
या सर्व गोष्टींचा विचार करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जनता कर्फ्यूपेक्षा ही व्यक्तिगत काळजी, जागरूकता, प्रतिबंधात्मक उपाय, सॅनिटाईजिंग, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर अधिक आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची काळजी घेऊन राजारामपुरी परिसरातील व्यापार, व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी आणि सचिव रणजित पारेख यांनी दिली. दरम्यान, राजारामपुरी परिसरात विविध लहान-मोठी १२०० दुकाने आहेत.