सोमवारपासून सरसकट दुकाने सुरु होणार : आरोग्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 07:05 PM2021-07-16T19:05:36+5:302021-07-16T19:08:39+5:30
CoronaVirus In Kolhapur : संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या खाली आल्यामुळे सरसकट सर्वच दुकाने सोमवारपासून सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या खाली आल्यामुळे सरसकट सर्वच दुकाने सोमवारपासून सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच कोल्हापूर जिल्हा आता स्तर ३ वर आला असल्याचे सांगत परवानगी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी तसेच छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यातून होत होती. प्रायोगिक तत्वावर मागच्या आठवड्यात तशी परवानगीही देण्यात आली. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी काही कमी होत नसल्यामुळे सोमवारपासून पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली आणि निवेदन देऊन सरसकट सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अशी मागणी केली.
त्यावेळी त्याचठिकाणी उपस्थित असलेल्या महानगरपालिका प्रशासक डॉ. कादबंरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे आरोग्य मंत्र्यांनी विचारणा केली. तेव्हा प्रशासक बलकवडे यांनी सांगितले की, कालच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अहवाल आला असून, जिल्ह्याची कोरोनाबाधितांची टक्केवारी दहाच्या खाली आल्याचे म्हटले आहे.
जिल्ह्यातील बाधितांची टक्केवारी दहाच्या खाली आली असेल तर मग सोमवारपासून सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी केली. व्यापाऱ्यांनी काळजी करु नये, कोल्हापूरचा समावेश स्तर ३ मध्ये होणार आहे, असे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
आरोग्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सतीश माने, शाम बासरानी, अनिल पिंजानी, दर्शन गांधी, विपुल पारेख, माणिक पाटील चुयेकर, प्रताप पवार, किरण नकाते, जयंत गोयानी, मनोज बहिरशेठ, शाम जोशी, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
जनता बझार चौकात सभा
जनता बाजार चौक येथे राजारामपुरीतील व्यापार्यांची सभा झाली. यावेळी सोमवारपासून सर्व व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ललित गांधी यांनी सभेत सांगितली. आतापर्यंतच्या लढ्याची तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीची माहिती देऊन आरोग्यमंत्र्यांनी सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचे आदेश देण्याचे मान्य केल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रमुख व महापालिका आयुक्त यांनीसुद्धा सकारात्मक अहवाल देऊन व्यापाऱ्यांच्या मागणीला पाठबळ दिल्याचे गांधी यांनी सांगितले.