जाचक अटींमुळे अपघात विमा योजनेस अल्प प्रतिसाद
By admin | Published: May 26, 2015 12:37 AM2015-05-26T00:37:39+5:302015-05-26T00:52:02+5:30
चंदगड तालुक्यातील स्थिती : ५ वर्षांत अवघे ४१ लाभार्थी, अटी शिथिल करण्याची मागणी
नंदकुमार ढेरे -चंदगड -नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासनाकडून
संबंधित कुटुंबाला शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत १ लाख रुपयांची मदत दिली जाते. पण, या योजनेतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू व अन्य काही अटींमुळे गेल्या पाच वर्षांत चंदगड तालुक्यातील केवळ ४१ जणांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा नैसर्गिक आपत्ती किंवा अपघाती मृत्यू किंवा दोन अवयव निकामी झाले, तर लाख रुपयांची मदत मिळते. एक अवयव निकामी झाला, तर ५० हजार रुपये मिळतात. योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय १० ते ७५ वर्षे या दरम्यान असण्याची अट आहे. त्याचबरोबर प्रस्तावासोबत अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे नाव ७/१२ वर आले, तर त्या संबंधी फेरफार नोंद (गाव नमुना नं. ६-ड), पोलीस पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, आदी कागदपत्रे जोडून प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयास सादर करावा लागतो. कृषी कार्यालय तो विमा कंपनीस पाठवते. त्यानंतर योजनेचा लाभ विमा कंपनी देते.७/१२ पत्रकावर कुटुंबातील वडीलधारी म्हणजेच कर्त्या व्यक्तीचे नाव असते. परंतु प्रत्यक्षात शासनाने कर्ती म्हणून संबोधलेली व्यक्ती वयोमानानुसार तसेच आजारपण वगैरे अन्य कारणाने खऱ्या अर्थाने कर्ती असतेच असे नाही. तसेच वडीलधारी व्यक्ती हयात असल्याने कुटुंबातील अन्य कर्त्या व्यक्तींची नावे (मुलांची) ७/१२ पत्रकी नोंद नसतात. पण बऱ्याच कुटुंबाचा भार या मुलांवर अवलंबून असतो. दुर्दैवाने कुटुंब चालवणाऱ्या कर्त्या व्यक्तीचा (मुलाचा) मृत्यू झाल्यास संबंधिताचे नाव ७/१२ पत्रकी नसल्याने शासनाच्या नियमानुसार या कुटुंबाला मदतीची रक्कम मिळत नाही.त्यामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा (मुलाचा) मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली अनेक कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. याच जाचक अटीमुळे २००८-०९ त २०१४-१५ या पाच वर्षांत चंदगड तालुक्यातील केवळ ४१ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.
२०१४-१५ मध्ये कृषी कार्यालयास चार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात कुटुंबातील कर्त्या पण ७/१२ पत्रकी खातेदार म्हणून नावाची नोंद नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर संबंधित कुटुंबाला या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते.
ही बाब लक्षात घेऊन शासनाला जर खऱ्या अर्थाने शेतकरी जनता अपघात योजनेचा लाभ अडचणीतील शेतकरी कुटुंबाला द्यायचा असेल, तर या योजनेतील जाचक अटी रद्द करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वच पातळीवर उठाव होण्याची गरज आहे.