गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘एक खिडकी’ योजनेला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:37 PM2017-08-09T16:37:05+5:302017-08-09T16:37:05+5:30
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात सुरू केलेल्या ‘एक खिडकी’ योजनेला गणेश मंडळांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. गेली दोन दिवस याठिकाणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे दोनच पोलीस बसून होते. अन्य पोलीस ठाण्यासह महापालिका, महावितरण, प्रदूषण मंडळाचे कर्मचारीही फिरकले नाही. अखेर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर मंगळवारी दुपारपासून याठिकाणी कर्मचारी बसून राहिले. गेल्या चार दिवसांत १२१ मंडळांनी नोंदणी करून घेतली.
सार्वजनिक मंडळांना गणेश प्रतिष्ठापना, लाऊड स्पीकरचा वापर, मंडप परवाना, खड्डे परवाना तसेच विसर्जन मिरवणुकीचा परवाना घेणे बंधनकारक आहे. याकरिता त्यांना परवानगी मागणी अर्ज करावा लागतो. कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कार्यालयांत भटकंती करावी लागते. त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ‘एकाच छताखाली सर्व परवाने’ मिळण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू केली आहे. पोलीस, महापालिका, महावितरण व प्रदूषण मंडळ येथील कर्मचारी याठिकाणी बसून आहेत. मंडळांना धर्मादाय आयुक्तालयाकडून परवानगी मिळाली आहे का, याची पाहणी करून पुढील परवाने दिले जातात. ही ‘एक खिडकी योजना’ सुरू करुन तीन दिवस झाले आहेत.
गेली दोन दिवस लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी याठिकाणी बसून होते. अन्य राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी पोलीस ठाण्यांसह महापालिका व ‘महावितरण’चे कर्मचारी फिरकलेच नाहीत. त्याचबरोबर मंडळांचाही गतवर्षीपेक्षा प्रतिसाद कमी दिसून आला. डॉ. अमृतकर यांनी उपस्थित कर्मचाºयांकडून माहिती घेत महापालिका, महावितरण व अन्य पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांकडे पाठपुरावा केल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर सर्व कर्मचारी उपस्थित राहिले.