पॅकबंद ‘शिवशाही’ला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:24 AM2021-04-01T04:24:08+5:302021-04-01T04:24:08+5:30
गेल्या वर्षीपासून कोरोनाचा संकट सर्व जगावर पसरले आहे. त्यात एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवास करतानाही सुरक्षित प्रवास कसा होईल, ...
गेल्या वर्षीपासून कोरोनाचा संकट सर्व जगावर पसरले आहे. त्यात एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवास करतानाही सुरक्षित प्रवास कसा होईल, याकडे प्रवाशांचे काटेकोरपणे लक्ष असते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कमी प्राधान्य देऊन प्रवासी स्वत:च्या अथवा ट्रॅव्हल्सच्या बसेसना अधिक प्राधान्य देऊ लागले आहेत. काही प्रवाशांच्या मते पॅकबंद बसेसमधून गेल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता अधिक असते; तर काहींना बसस्थानकावरील गर्दी, गोंगाट नको असतो. त्यातूनच कोरोनाची लागण होऊ शकते. असे १०० पैकी ७० जणांना वाटते. त्यामुळे अनेकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला रामराम करीत स्वत:च्या, खासगी चारचाकीने प्रवास करण्यास अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या एस. टी. महामंडळास दिवसेंदिवस मोठा आर्थिक फटका बसत आहे. अनेक वेळा या वातानुकूलित बसना एकूण आसन क्षमतेच्या अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्याचा थेट परिणाम व्यवसायावरही होत आहे. एकूण फेऱ्या आणि सर्व खर्च जाऊन महामंडळास काहीच हाती लागत नाही. विशेष म्हणजे यांतील काही बसेस खासगी कंत्राटी पद्धतीने महामंडळाकडे घेण्यात आलेल्या आहेत. नियमित वातावरणात तिकिटाचे दर उच्च असूनही अनेक प्रवासी सुरक्षित आणि चांगला प्रवास म्हणून ‘शिवशाही’ने प्रवास करणे पसंत करतात. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता आलेल्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी शिवशाहीच काय, सर्वच सार्वजनिक वाहतुकीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.
अधिक पसंतीच्या पुणे मार्गालाही अल्प प्रतिसाद
पुण्यामध्ये आयटीसह इतरत्र नोकरी करणारे तरुण, तरुणी दोन दिवसांचा विकऑफ असल्यामुळे शुक्रवारी रात्री कोल्हापूरला येत असत आणि दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी सकाळी पुण्याकडे प्रस्थान करीत असत. हा अनेक प्रवाशांचा आठवड्याचा क्रम होता. विशेष म्हणजे अनेकांची महिनोमहिन्यांची खास शिवशाहीची आरक्षणे फुल्ल होती. मात्र, कोरोनाच्या लाटेनंतर ही आरक्षणे सोडाच; नियमित प्रवासाकडेही या ठरलेल्या प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.
उत्पन्नात घट
लाॅकडाऊननंतर कोल्हापूर-पुणे, नाशिक, मुंबई, सोलापूर या मार्गांवरील शिवशाही सेवा पूर्ववत झाली. तिकिटांचे दर उच्च असूनही अनेकजण या बसेसमधून प्रवासास प्राधान्य देत होते. मात्र, कोरोनाची लाट पुन्हा सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांपासून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही पाठ फिरविली आहे. त्यामुळे शिवशाहीचे उत्पन्न २५ टक्क्यांवर आले आहे.
कोट
नियमित बसेसपेक्षा या बसेसमधून महामंडळास चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, कोरोनाच्या कहर पुन्हा वाढू लागल्यानंतर प्रवासी संख्येत घट आली आहे. त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होऊ लागला आहे. महामंडळ प्रवाशांची सर्व ती काळजी घेते. तरीही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ, कोल्हापूर विभाग
शिवशाहीची एकूण संख्या - ३४
सध्या सुरू - १९