संक्षिप्त वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:18 AM2021-07-01T04:18:00+5:302021-07-01T04:18:00+5:30
कोल्हापूर : येथील न्यू कॉलेजला एमएससी बॉटनी, फिजिक्स आणि अनॅलिटिकल केमिस्ट्री तसेच एम. कॉम., एम. ए. समाजशास्त्र व अर्थशास्त्र ...
कोल्हापूर : येथील न्यू कॉलेजला एमएससी बॉटनी, फिजिक्स आणि अनॅलिटिकल केमिस्ट्री तसेच एम. कॉम., एम. ए. समाजशास्त्र व अर्थशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना शासनाने या शैक्षणिक वर्षांपासून मान्यता दिली आहे.
अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमासाठीची मागणी होती. या मान्यतेसह आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय यामुळे कोल्हापूर व आसपासच्या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.
--
वाइल्ड कार्डद्वारे शाळेत प्रवेश
कोल्हापूर : शिंगणापूर चंबुखडी येथे जिल्हा परिषद संचलित राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी, खो-खो, कुस्ती व मैदानी खेळातील सुवर्ण, रौप्य, ंकांस्यपदक विजेत्या खेळाडूंना वाइल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात येत आहे.
तरी पात्र खेळाडूंनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्जासाठी www.zpkolhapur.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी व आपले ऑफलाईन अर्ज शाळेत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
कचरावेचक संघटनेकडून एसएमएस मॅरेथॉन
कोल्हापूर : येथील वसुधा कचरावेचक संघटनेच्यावतीने विविध न्याय मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना एकाचवेळी एसएमएस पाठवण्यात आले. यात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त, उपायुक्त, स्थायी समिती सभापती, आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक यांना ५६५ कचरावेचक महिलांनी एकाचवेळी एसएमएस पाठवले. यात कचरावेचक महिलांच्या बचत गटांना कचरा वर्गीकरणाच्या कामाचा ठेका द्यावा, वॉर्ड व गावानुसार कचरा संकलन केंद्र उपलब्ध करून द्यावे, मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
---
वाफेचे मशीन वाटप
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्यावतीने रिक्षाचालकांना वाफेच्या मशीनचे वाटप करण्यात आले. यासह सवलतीच्या दरात रिक्षा इन्शुरन्सचे वाटप, रिक्षा निर्जंतुकीकरण, रिक्षा ॲम्ब्युलन्स असे उपक्रम राबवण्यात आले. या वेळी अध्यक्ष राकेश गायकवाड, कार्याध्यक्ष लाला बिरजे, उपाध्यक्ष प्रकाश हरणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
---