महापालिका रुग्णालयात डॉक्टर्सची कमतरता, ६० डॉक्टर्स भरण्यासाठी जाहिरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:34+5:302021-05-14T04:22:34+5:30
महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व विकासकामांवरील लक्ष काढून घेऊन कोविड विरुद्धच्या लढाईला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. महापालिकेत ज्या ज्या बैठका ...
महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व विकासकामांवरील लक्ष काढून घेऊन कोविड विरुद्धच्या लढाईला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. महापालिकेत ज्या ज्या बैठका होतात, त्या कोविड संबंधीच्याच असतात. कोविड विरुद्धच्या लढाईत महापालिकेला डाॅक्टर्सची कमतरता जाणवत आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने नुकतीच जाहिरात देऊन डॉक्टर्स भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे.
कोविड रुग्णांवरील उपचाराकरिता आतापर्यंत महापालिकेने ५४ वैद्यकीय अधिकारी, १४१ स्टाफ नर्स, ७ फार्मासिस्ट, १० लॅब टेक्निशियन भरले असून, गुरुवारी आणखी ६० डॉक्टर्सकरिता जाहिरात दिली आहे. प्राधान्याने एमबीबीएस डॉक्टर्सना भरती करून घेतले जाणार आहे. जर एमबीबीएस डॉक्टर्स मिळाले नाहीत, तर मात्र बीएचएमएसना प्राधान्य दिले जाणार आहे.
पालिकेमार्फत आयसोलेशन रुग्णालय, शिवाजी विद्यापीठ डीओटी, विद्यापीठातील तीन वसतिगृहाच्या इमारतीतून कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. या ठिकाणी डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्टची कमतरता पडत आहे. नजीकच्या काळात कोविड रुग्णांची संख्या वाढली, तर १०४ डॉक्टर्स, २६८ नर्स, ४४ फार्मासिस्ट लागणार आहेत. त्याचे नियोजनही आतापासून सुरू झाले आहे.
डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट भरतीकरिता अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, ही एक डोकेदुखी आहे. काही खासगी रुग्णालयांनी कोविडची दुसरी लाट येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अगोदरच आवश्यक स्टाफची भरती करून घेतली आहे. त्यामुळे महापालिकेला भरतीत अडचणी येत आहेत.
बालरोग तज्ज्ञांचे सहकार्य घेणार-
कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल असा तज्ज्ञांचा अंदाज असल्यामुळे महापालिका प्रशासनाने आतापासूनच त्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. यासंदर्भात नुकतीच बालरोग तज्ज्ञांची बैठक प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आयोजित केली होती. स्वतंत्र १०० बेडचे रुग्णालय, तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. या रुग्णालयास खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
कोट -
महापालिका रुग्णालयात तसेच कोविड केअर सेंटरमधून रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने डॉक्टर्स, नर्स यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती तातडीने केली जात आहे.
रविकांत आडसुळ, उपायुक्त