इचलकरंजीत कोविड केअर सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:23 AM2021-05-16T04:23:26+5:302021-05-16T04:23:26+5:30
पालिकेला घरचा आहेर इचलकरंजी : शहर, परिसरात कोरोनाचे संकट वाढून रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी कोविड केअर ...
पालिकेला घरचा आहेर
इचलकरंजी : शहर, परिसरात कोरोनाचे संकट वाढून रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी कोविड केअर सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे व्यंकटेश्वरा हायस्कूल आणि तात्यासाहेब मुसळे कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने औषध पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आरोग्य सभापती संजय केंगार यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करून नगरपालिकेला घरचा आहेर दिला आहे.
पत्रात, शहर परिसरात दैनंदिन रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शहरातील रुग्णसंख्या पाहता पुरवठा होणार्या औषधांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने रुग्णांना औषध बाहेरील मेडिकलमधून आणण्यास सांगितले जात आहे. ही औषधे महागडी असल्याने रुग्णांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. उपचार घेणारे रुग्ण हे इचलकरंजीतील कामगार वर्गातील असल्याने औषधे खरेदी करताना त्यांना आर्थिक अडचण येते. त्यामुळे शहरातील कोविड केअर सेंटरना तातडीने आवश्यक त्या औषधांचा पुरवठा नगरपरिषदेमार्फत होण्यासाठी तत्पर कार्यवाही करण्यात यावी, असे केंगार यांनी म्हटले आहे. वास्तविक नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी व आरोग्य सभापती यांनी दररोज कोविड केंद्रांचा आढावा घेणे आवश्यक आहे. तेथील अडचणी सोडविणे गरजेचे आहे. असे असताना तिकडे दुर्लक्ष होत असल्याने सभापती यांना लेखी पत्र देऊन मागणी करावी लागते. हा घरचा आहेर असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.