'स्वाभिमानी'च्या सभासदांना फटका
By admin | Published: October 28, 2014 12:12 AM2014-10-28T00:12:17+5:302014-10-28T00:18:03+5:30
फरक बिलातील फरक :‘गोकुळ’च्या तुलनेत कमी दर, संस्थाचालकांमध्ये तीव्र नाराजी
कुरुंदवाड : स्वाभिमानी दूध संघाने यंदा ‘गोकुळ’पेक्षा कमी दूध फरक बिल दिले आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ला दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांना सुमारे ३० लाखांचा फटका बसल्याने संस्थाचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, ‘गोकुळ’ने जाहीर केलेल्या दूध फरकाबरोबर दर देण्याची केलेली स्वाभिमानीची घोषणा यंदा हवेतच विरली आहे. त्यामुळे ‘पांढऱ्या दुधातील काळे बोके कोण’, असा सवाल दूध उत्पादक करीत आहेत.
खासदार राजू शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून ऊस आंदोलन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक न्याय मिळवून देत आहेत. शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय असलेल्या दूध व्यवसायातही उत्पादकांची लूटमार होत असल्याने खा. शेट्टी यांनी सहा वर्षांपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी निर्धार यात्रा काढली होती. यामध्ये दुधाला दर मिळाला पाहिजे, दिवाळी बोनस योग्य दिला पाहिजे, फॅटची मारामारी थांबविली पाहिजे, आदी प्रमुख मागण्या होत्या.
दूध उत्पादकांना योग्य न्याय मिळवून द्यावा या उद्देशाने खा. शेट्टी यांनी २००९ ला खासगी स्वरूपात स्वाभिमानी दूध अॅग्रो प्रोडक्ट नावाखाली दूध संघाची निर्मिती केली. राजकारणविरहित संघ, योग्य नियोजन, काटकसर यामुळे स्वाभिमानी दूध संघ दूध उत्पादकांच्या विश्वासार्हतेला पात्र ठरला. त्यामुळे दररोजच्या संकलनाने पन्नास हजारांहून अधिक लिटरचा टप्पा ओलांडला. ‘गोकुळ’सारख्या इतर कपातींना फाटा देत स्वाभिमानीने दूध संकलन केंद्रांना दूध बिल देत वेगळ्या आदर्शाचा पायंडा घातला.
‘गोकुळ’ दिवाळी बोनस जाहीर करताना केलेल्या रकमेत २० पैसे कपात करून डिंबेचर्स ठेव ठेवून घेतो. मात्र, स्वाभिमानीने गोकुळ जो दर जाहीर करेल, तितकीच रक्कम विनाकपात उत्पादकांना देण्याची परंपरा आजतागायत ठेवली होती.
यंदा गोकुळ दूध संघाने दिवाळी बोनस म्हशीसाठी प्रतिलिटर एक रुपये ९५ पैसे, तर गाय दुधासाठी एक रुपये पाच पैसे जाहीर करून २० पैसे डिबेंचर्स कपात केली. मात्र, स्वाभिमानीने म्हैस दुधासाठी १.८०, तर गाय दुधासाठी ८५ पैसे प्रतिलिटर बोनस दिला आहे. त्यामुळे गोकुळने जाहीर केलेल्या दराप्रमाणे बोनस देण्याची परंपरा यावेळी स्वाभिमानीने मोडीत काढली. परिणामी स्वाभिमानीचे दररोज सरासरी ५० हजार लिटर संकलन गृहीत धरले असता प्रत्येक लिटरला साडेसतरा पैसे फरकानुसार सुमारे ३२ लाख रुपयांचा फटका दूध संकलन केंद्रांना पर्यायाने दूध उत्पादकांना बसला आहे.
वास्तविक दूध संघ नफ्यात असतानाही असा निर्णय का घेतला गेला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ऊस उत्पादकांबरोबर दूध उत्पादकांना न्याय देण्याचा विचार करणाऱ्या खा. शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे दूध उत्पादकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यंदाचा फरक असा....
‘गोकुळ’चा दिवाळी बोनस स्वाभिमानीचा बोनस
४ म्हैस दूध - १ रुपये ९५ पैसे (प्रतिलिटर)१ रुपये ८० पैसे
४गाय दूध - १ रुपये ५ पैसे (प्रतिलिटर)८५ पैसे
( गोकुळकडून२० पैसे डिबेंचर्स कपात )