‘गोकुळ’च्या उत्पादकांना कोरोना व्हावा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:22 AM2021-03-07T04:22:05+5:302021-03-07T04:22:05+5:30
(अरुण नरके यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ...
(अरुण नरके यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या असताना केवळ ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा अट्टहास का? ‘गोकुळ’च्या दूध उत्पादकांना कोरोना व्हावा, असे कोणाला वाटते का? असा सवाल ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी शनिवारी केला. यामागील बोलविता धनी कोण आहे? हे जिल्ह्याला माहीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाने ‘गोकुळ’ची प्रक्रिया सुरू आहे. सत्तारूढ गटाने निवडणुकीच्या स्थगितीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत अरुण नरके यांना विचारले असता, राज्यातील सहकारी संस्थांना एक नियम आणि ‘गोकुळ’ला वेगळा का? जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच जिल्हा बँक, महापालिकेसह इतर संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या असताना ‘गोकुळ’साठीच अट्टहास करणे चुकीचे आहे. राज्यातील इतर सभासदांना कोरोना होतो आणि ‘गोकुळ‘च्या सभासदांना तो होत नाही का? म्हणजे संघाच्या उत्पादकांना कोरोना व्हावा, असे कोणाला वाटते का? अशी खंतही अरुण नरके यांनी व्यक्त केली.
सरकारने तटस्थ राहावे
सरकारने नेहमी तटस्थ म्हणून राहिले पाहिजे. कोणाच्या तरी सांगण्यावरून निर्णय घेणे चुकीचे आहे. तरीही राज्य सरकार निवडणुकीबाबत आग्रही का आहे, हे कोड्यात टाकणारे असल्याचे अरुण नरके यांनी सांगितले.