मतदानाला आम्ही महिलांच्या रांगेत उभारायचे की पुरुषांच्या?, तृतीयपंथीयांचा सवाल
By इंदुमती सूर्यवंशी | Published: March 25, 2024 03:33 PM2024-03-25T15:33:01+5:302024-03-25T15:33:28+5:30
स्वतंत्र रांग किंवा प्राधान्य देण्याची मागणी
इंदुमती गणेश
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा लोकशाहीचा मोठा उत्सव सध्या साजरा होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना तृतीयपंथीयांचा वर्ग मात्र आजही मतदानाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. मतदान केंद्रांवर महिलांची व पुरुषांची स्वतंत्र रांग असते, पण आम्ही कोणत्या रांगेत थांबायचे, असा प्रश्न तृतीयपंथीयांना पडला आहे. त्यामुळे मतदानासाठी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांग बनविण्याची किंवा मतदान करण्यासाठी प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.
लोकसभेसाठी जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक विभागाकडून मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. मतदारांना समारंभ वाटावा, असे मतदान केंद्र साकारले जाणार आहे. तेथे त्यांना पाळणाघरापासून पाणी, स्वच्छतागृह, बसण्याची सोय अशा सोयीसुविधा निर्माण केल्या जात आहे. वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना घरून टपाली मतदानाची सोय केली आहे. पण यामध्ये तृतीयपंथी मतदारांचा फारसा विचार झालेला दिसत नाही.
बघण्याचा दृष्टिकोन विचित्र
तृतीयपंथी मतदार जेंव्हा मतदान केंद्रांवर येतात तेंव्हा महिला व पुरुष मतदारांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. दुसऱ्या ग्रहावरची व्यक्ती आली आहे की काय अशा नजरेतून त्यांना सगळे न्याहाळत असतात. महिलांच्या किंवा पुरुषांच्या कुणाच्याही रांगेत थांबले तरी त्यांची चेष्टा होते.
जिल्ह्यात १८१ मतदार
मतदार नोंदणी अत्यावश्यक असल्याचे समजल्यानंतर तृतीयपंथीय मतदारांमध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८१ तृतीयपंथी मतदार आहेत. तर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ४८ हजार तृतीयपंथी आहे.
तृतीयपंथी समुदायाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन नेहमी उपेक्षितच राहिला आहे. चेष्टा आणि विचित्र नजरांचा सामना करावा लागत असल्याने ते मतदानाला येण्याचे टाळतात. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांग करावी किंवा मतदानाला त्यांना प्राधान्य द्यावे. -मयुरी आळवेकर, अध्यक्षा, मैत्री तृतीयपंथीय संघटना