खोडा घालायला मी पाटील नाही, महाडिक आहे; शौमिका महाडिक यांचा सतेज पाटलांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 01:28 PM2022-05-05T13:28:16+5:302022-05-05T13:29:08+5:30
कोल्हापूर : ‘ गोकुळ’मध्ये गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी चुकीच्या मार्गाने सुरू आहेत, त्याला त्या-त्यावेळी जाब विचारला आहे. रमजान ईदला ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी चुकीच्या मार्गाने सुरू आहेत, त्याला त्या-त्यावेळी जाब विचारला आहे. रमजान ईदला दरवर्षी उच्चांकी दूध विक्री होतेच. पण, यावेळेला २० लाख लिटरची विक्री झाल्याबद्दल संघ प्रशासनाचे अभिनंदन करते. चांगल्याला चांगले म्हणण्याची महाडिक कुटुंबाची रीत आहे. त्यामध्ये खोडा घालायला मी पाटील नाही, महाडिक आहे, असा पलटवार ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर केला.
महाडिक म्हणाल्या, ‘गोकुळ’च्या निवडणुकीत नाहक बदनामी करून सत्ता मिळवली. मात्र सध्या नेते मंडळींचा हस्तक्षेप सुरू आहे, तेवढा कधीच महादेवराव महाडिक यांनी केला नाही. ग्राहकांवर बोजा टाकून उत्पादकांना दरवाढ केल्याबद्दल आम्हाला विचारणाऱ्यांनी आता काय केले, याचे उत्तर द्यावे. मुंबईत ३५० कोटींचा जागा खरेदीचा डाव आपण हाणून पाडला. जमीन लाटण्याचा आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी देवस्थानच्या जमिनी लाटून साम्राज्य उभे केले, ‘गोकुळ’मध्येही तेच करत आहेत.
लाखो लिटर दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर अवलंबून आहेत. ईर्ष्या निवडणुकीपुरती असावी, संघाचे नुकसान होईल, असे कोणी वागू नये. मुंबई, पुण्यातून दुधाच्या प्रतीबाबत तक्रारी असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.
मी ३० वर्षाचा हिशेब देते....
‘गोकुळ’मध्ये गेल्या ३० वर्षात दूध उत्पादकांचे हितच जोपासले गेले. मी ३० वर्षाचा हिशेब देते, तुम्ही गेल्या वर्षभरातील द्या. उठसूठ खोटे बोलणे जास्त दिवस टिकत नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.
महिला सन्मानाच्या गप्पा बंद करा
‘गोकुळ’च्या निवडणुकीत महिलेला पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडलेल्या मंडळींनी ‘उत्तर’च्या पोटनिवडणुकीत महिला सन्मानाची भाषा केली. महिला संचालिकेला संघातील माहिती देऊ नका, असे सांगणाऱ्यांनी या गप्पा बंद कराव्यात, असे महाडिक यांनी सांगितले.
मुश्रीफ हस्तक्षेप करत नाहीत
माझ्यासोबत निवडून आलेल्या सहकाऱ्यांवर काही बंधने आहेत. त्यातच निवडणुकीत महाडिकांवर आरोप करून सत्ता मिळवल्याने मलाच उत्तर द्यावे लागेल. संघाच्या कामकाजात पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप अधिक असून मंत्री हसन मुश्रीफ हे हस्तक्षेप करत नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.