कोल्हापुरात जल्लोष
By admin | Published: February 28, 2016 12:57 AM2016-02-28T00:57:43+5:302016-02-28T00:57:43+5:30
फटाक्यांची आतषबाजी
कोल्हापुरात जल्लोष
कोल्हापूर : आशिया कप टी-२० क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानचा शनिवारी दारुण पराभव केला. या विजयानंतर कोल्हापुरातील शिवाजी चौकात रात्री क्रिकेटप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.
‘आशिया कप’मधील शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होता. हा सामना भारताने ५ गडी राखून जिंकला. भारत-पाकिस्तान सामन्याला जणू युद्धाचे स्वरूप असते. या सामन्यातील जय-पराजय देशवासीयांसाठी अभिमानाचा विषय असतो. शनिवारी सामना सुरू होताच शहरवासीय दूरचित्रवाणी संचासमोर बसले होते. भारताने सामना जिंकताच रात्री क्रिकेटप्रेमींनी जल्लोष सुरू केला. तरुणाईने शिवाजी चौकात एकच गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी करतानाच त्यांनी दुचाकी गाड्यांचे सायलन्सर काढून जल्लोष केला. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.
तलवार नेताना पोलिसांनी पकडले
जल्लोष सुरू असतानाच शिवाजी चौकात शनिवार पेठ परिसरातील दोघेजण दुचाकीवरून तलवार घेऊन जाताना बंदोबस्तावरील पोलिसांना दिसले. त्यांनी या दोघांना पकडून हत्यारासह पोलीस ठाण्यात आणले. ही तलवार आपण लग्नासाठी नेत असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या दोघांवर सीआरपीसी २८३ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच शनिवार पेठ व सोमवार पेठ परिसरातील मित्रांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती.(प्रतिनिधी)