बेंच खरेदीप्रकरणी १0 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:57 AM2019-07-30T11:57:56+5:302019-07-30T12:00:24+5:30
दोन कोटी रुपयांच्या बेंच खरेदीप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण आणि वित्त विभागातील १० अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. या सर्वांकडून १0 दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे.
कोल्हापूर : दोन कोटी रुपयांच्या बेंच खरेदीप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण आणि वित्त विभागातील १० अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. या सर्वांकडून १0 दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन मंडळातून नावीन्यपूर्ण योजनेतून सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना बेंच देण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती. तिरूपती ट्रेडिंग कंपनी (बीड) आणि अथर्व ट्रेडिंग कंपनी (औरंगाबाद) यांना याचे कंत्राट द्यावे, असे आदेश पुण्यातून शिक्षण विभागाने दिले होते.
त्यानुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र बेंच पुरविल्यानंतर त्यातील बेंचच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी, हा निकष डावलून बेंच पुरवठा करण्याआधीच टेस्ट रिपोर्ट देण्यात आला होता, तसेच ९० टक्के आणि १० टक्के अशा दोन टप्प्यांत दोन कोटी रुपयांची रक्कम अदा करणे आवश्यक असताना, संपूर्ण रक्कम एकाचवेळी अदा करण्यात आली आहे.
दरम्यान, २०१३/१४ च्या लेखापरीक्षण पुनर्विलोकनासाठी आलेल्या पंचायतराज समितीने या खरेदी प्रक्रियेबाबत कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले होते.
मित्तल हे पंचायतराज समितीच्या साक्षीसाठी मुंबईत होते. गुरुवारी पुण्यात बैठकीसाठी थांबून ते कोल्हापुरात आल्यानंतर तब्येत बरी नसल्याने रजेवर होते. अखेर सोमवारी त्यांनी या कारणे दाखवा नोटिसांवर सह्या केल्या.
यांना निघाल्या नोटिसा
तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी गणेश पाटील, वरिष्ठ लेखाधिकारी व विद्यमान मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, लेखाधिकारी राजेंद्र नागणे, तत्कालीन सहायक लेखाधिकारी प्रकाश काटकर, तत्कालीन कनिष्ठ लेखाधिकारी संतोष ओतारी, तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी आर. वाय. अघम (सेवानिवृत्त), तत्कालीन उपशिक्षणाधिकारी दिनकर हरी पाटील (सेवानिवृत्त), तत्कालीन कनिष्ठ लेखाधिकारी संभाजी हंकारे, वरिष्ठ सहायक (लेखा) अरुण पोवार (सेवानिवृत्त), तत्कालीन कनिष्ठ सहायक नामदेव गाताडे.