Kolhapur: रेबीज लस प्रकरणी डॉक्टरांना बजावली 'कारणे दाखवा' नोटीस, रुग्णांना पाठवले होते बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:14 IST2024-12-16T15:14:01+5:302024-12-16T15:14:20+5:30
आमदार आवाडे यांच्याकडून दखल

Kolhapur: रेबीज लस प्रकरणी डॉक्टरांना बजावली 'कारणे दाखवा' नोटीस, रुग्णांना पाठवले होते बाहेर
इचलकरंजी : इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णास रेबीज लस उपलब्ध नसल्याचे सांगून कोल्हापूर अथवा सांगलीला जाण्याचा सल्ला देण्याची घटना डॉक्टरांकडून घडली. युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले यांनी याची तक्रार अधीक्षकांकडे केल्यानंतर याची गंभीर दखल घेत डॉक्टर व लस नाही, असे सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तक्रारीनंतर तातडीने लस उपलब्ध करून देण्यात आली.
जयभीमनगर येथील दोन व्यक्तींवर शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांमुळे घाबरलेल्या व्यक्तींनी रुग्णालयात धाव घेतली. यादरम्यान रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांनी रेबीज लसीचा साठा संपल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी सांगली अथवा कोल्हापूरला जाण्याचा सल्ला देण्याबरोबरच रेफर पत्रही दिले. संबंधित व्यक्तींनी ही माहिती आठवले यांना सांगितली. त्यांनी येऊन रुग्णालयात लसीबाबत विचारणा केल्यानंतर रेबीज लस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तींवर आयजीएम रुग्णालयात उपचार झाले.
रुग्णालयात औषध साठा उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र, अशा घटना डॉक्टरांकडून घडत असल्याने रुग्णालयातील अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. जनतेच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या रुग्णालयात उपचार होत नसतील, तर नागरिक कोठे जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आमदार आवाडे यांच्याकडून दखल
रुग्णांना रेबीज लस मिळत नसल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांतून प्रसारित झाला होता. त्याची गांभीर्याने आमदार राहुल आवाडे यांनी दखल घेतली. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका भाग्यरेखा पाटील यांना संबंधित घटनेचे गांभीर्य सांगितले. तसेच नाराजी व्यक्त केली. डॉ. पाटील यांनी संबंधित डॉक्टरांवर कारणे दाखवा नोटीस बजावली.