कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By भारत चव्हाण | Published: May 20, 2024 07:16 PM2024-05-20T19:16:15+5:302024-05-20T19:16:35+5:30

नगरोत्थानमधील रस्त्यांच्या कामातील त्रूटींमुळे धरले जबाबदार

Show cause notice to three officials including Additional Commissioner of Kolhapur Municipal Corporation | कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर : शंभर कोटींच्या सोळा रस्त्यांच्या कामास होत असलेला विलंब, कृती समितीने केलेले आंदोलन, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेली दखल आणि टोचलेले कान यामुळे महानगरपालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेतली. या कामात अधिकाऱ्यांत योग्य समन्वय नसल्यामुळे संतप्त  झालेल्या मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत १०० कोटींच्या निधीतून शहरातील १६ मुख्य रस्ते करण्यात येत आहेत. यातील मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक या रस्त्यावर डांबरीकरणानंतर पुन्हा खुदाई केल्याच्या तक्रारी प्रशासक मंजूलक्ष्मी यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने रस्त्यांच्या कामाची त्यांनी सोमवारी दुपारी पाहणी केली. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप-शहर अभियंता सतिश फप्पे, आर.के.पाटील, महादेव फुलारी उपस्थित होते. या ठिकाणी दिसून आलेल्या कामातील त्रुटी, या संबंधित विभागात समन्वय नसल्यामुळेच निर्माण झाल्या असल्याचे प्रशासकांच्या निदर्शनास आले. आधी सेवावाहिन्यांची कामे पूर्ण करुन घेणे अपेक्षित असताना ती घेतली नसल्याने रस्ते पुन्हा उकरावे लागले. त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून कामातही विलंब होत आहे. ही बाब गंभीर असल्याचे प्रशासकांच्या लक्षात आले.

कोळेकर तिकटी ते नंगीवली चौक, निर्मिती कॉर्नर ते कळंबा रोड, खरी कॉर्नर ते उभा मारूती चौक, माऊली चौक ते हुतात्मा चौक येथे सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाची प्रशासकांनी पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी ड्रेनेजचे मेनहोल, युटीलीटी व इतर बाबी डांबरीकरण करताना समन्वयाअभावी डांबरीकरणाच्या खाली गेल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक नागरिकांशी प्रशासकांनी संवाद साधला. त्यांच्या कामाबाबतीत तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या. अधिकारी व ठेकेदार यांना सर्व कामे दर्जेदार, विहित मुदतीत व टेंडरमधील स्पेसिफिकेशन प्रमाणे पूर्ण करुन घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच रस्तेवर अथवा गटारीमध्ये पाणी तुंबून कोणाच्याही घरात जाऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या.

Web Title: Show cause notice to three officials including Additional Commissioner of Kolhapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.