हुपरी ग्रामपंचायतीला ‘कारणे दाखवा’ नोटीस
By admin | Published: September 17, 2014 12:03 AM2014-09-17T00:03:52+5:302014-09-17T00:09:06+5:30
पोटकमिट्या बरखास्त प्रकरण: गटा-गटाच्या राजकारणाला वेगळे वळण
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या पोटकमिट्या बरखास्त करणे व नवीन निवडी करणे याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशास केराची टोपली दाखवत बेकायदेशीररीत्या खास सभेचे आयोजन केले. तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करून नवीन निवडी केल्या. या घडामोडीस जबाबदार धरून सरपंच सर्जेराव हांडे, ग्रामविकास अधिकारी ए. एस. वीरकर व विठ्ठल कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस लागू केली असून, लेखी खुलासा करण्याचा आदेश गटविकास अधिकारी शबाना मुल्ला यांनी बजाविला आहे.
सरपंच सुमन हांडे व ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ मुधाळे यांनी सत्ताधारी आवाडे गटाचा त्याग करून विरोधी शिवसेना-मनसे-राष्ट्रावादी कॉँग्रेसच्या तंबूत आश्रय घेतल्याने सत्ताधारी आवाडे अल्पमतात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी विरोधकांनी पोटकमिट्या बरखास्त करून नवीन निवडी करण्याचा राजकीय डाव खेळला. त्यासाठी १० सप्टेंबरला खास सभा घेतली. खास सभेस व पोटकमिट्या बरखास्त करण्यास विरोध करण्यासाठी आवाडे गटाने गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. खास सभेस कमिट्या बरखास्तीच्या विरोधकांच्या डावपेचाला शह देण्यासाठी आयोजित खास सभाच बेकायदेशीर असल्याचे पत्र ९ सप्टेंबरला मिळविले. या पत्राची दखलही न घेता सरपंच हांडे व ग्रामविकास अधिकारी वीरकर आणि कांबळे यांनी सभा घेऊन पोटकमिट्या बरखास्त करीत नवीन निवडीही जाहीर केल्या. त्यानंतर आवाडे गटाच्या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकारी शबाना मुल्ला यांनी सरपंचासह दोघा ग्रामविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस लागू केली. याप्रकरणी लेखी खुलासा करण्याचा आदेश बजाविला आहे.
सर्व काही अधिकारात : हांडे
सरपंच सुमन हांडे यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामपंचायतीच्या पोटकमिट्या बरखास्त करणे व निवडी करणे या बाबी सरपंचांच्या अखत्यारीतील आहेत. सरपंचांच्या अधिकारांचा वापर करून खास सभा बोलावून कायदेशीररीत्याच कामकाज केले. गटविकास अधिकाऱ्यांनी बजाविलेला नोटिसीचा व लेखी खुलाशाचा अभ्यास करून उत्तर दिले जाणार आहे.