लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना ‘कोल्हापुरी’ दाखवा - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 06:04 AM2024-08-23T06:04:12+5:302024-08-23T06:05:02+5:30

कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर गुरुवारी झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या मेळाव्यात ते बोलत हाेते. 

Show 'Kolhapuri' to those who misbehave in Ladaki Bahin Yojana - Eknath Shinde | लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना ‘कोल्हापुरी’ दाखवा - एकनाथ शिंदे

लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना ‘कोल्हापुरी’ दाखवा - एकनाथ शिंदे

कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा दाखवा, असे आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चौफेर हल्ला चढवला. आमच्या सरकारची ही देना बँक आहे, लेना बँक नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना या दीड हजाराचे मोल कळणार नाही. परंतु मी सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला सामान्यांची दु:खे माहिती आहेत, असा टोलाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर गुरुवारी झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या मेळाव्यात ते बोलत हाेते. 
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह आमदारांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ही योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयात गेले; पण उपयोग झाला नाही. आमचे सरकार ही ओवाळणी देणार याची खात्री होती म्हणूनच दीड कोटी महिलांनी अर्ज केले. कोविडच्या काळात पुणे-मुंबईत अनेकांच्या तोंडचा घास काढून घेणाऱ्यांनी आताही या योजनेबद्दल अपप्रचार करत तुम्हा महिलांच्या आणि मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सोन्याचे दिवस यावेत, यासाठी आम्ही काम करत असून, जशी राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होत जाईल, तशी ही रक्कम दीड हजारावरून तीन हजारही केली जाईल. 

फाशी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचारानंतर विराेधकांनी तोंडे उघडली नाहीत. परंतु केवळ राजकारण करत आता राजीनाम्याची मागणी केली जाते. हे सांगायची वेळ नसली तरी तुमच्या काळात ४,१८० बलात्कार झाले होते. परंतु आता ही कीड आम्ही संपवणार असून, बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशी मिळेपर्यंत शांत बसणार नाही.

शिंदे, फडणवीस, पवार यांच्याकडून औक्षण
अनेक ठिकाणी येणाऱ्या नेतेमंडळींचे महिलांकडून औक्षण केले जाते. परंतु कोल्हापूरच्या या महिलांच्या मेळाव्यात वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. व्यासपीठावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते नवदुर्गा रूपातील महिलांंना ओवाळण्यात आले. 

समरजित घाटगेंची दांडी
या मेळाव्यासाठी भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी यावे, अशी विनंती खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री त्यांना केली होती. परंतु घाटगे अखेरपर्यंत मेळाव्याकडे न फिरकल्याने त्यांचा भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

Web Title: Show 'Kolhapuri' to those who misbehave in Ladaki Bahin Yojana - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.