पडळ मंडल अधिकारी कार्यालयात सातबारा दुरुस्ती कॅम्पचा दिखावाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:29 AM2021-02-25T04:29:27+5:302021-02-25T04:29:27+5:30
माजगाव, यवलूज, पडळ, सातार्डे, माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे, वाघवे, उत्रे, निकमवाडी, कसबा ठाणे, म्हाळुंगे, पुशिरे, महाडीकवाडी आदी गावांतील ...
माजगाव, यवलूज, पडळ, सातार्डे, माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे, वाघवे, उत्रे, निकमवाडी, कसबा ठाणे, म्हाळुंगे, पुशिरे, महाडीकवाडी आदी गावांतील बहुतांश खातेदारांच्या सातबारा दुरुस्तीचे निराकरण झाले नसल्याने महसूल विभागाच्या या सावळागोंधळ कारभारावर खातेदारांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
तालुक्यातील वरील सर्व गावांच्या अनेक खातेदारांच्या संगणकीकृत सातबारा उताऱ्यामध्ये ऑनलाइन दुरुस्ती कामात महसूल विभागाकडून मोठ्या प्रमाणावर तांत्रिक त्रुटी आणि चुका झालेल्या आहेत. यामध्ये सातबारा, आठ अ यासह शेतकऱ्यांच्या शेतीचे क्षेत्र यासारख्या अनेक चुका महसूल विभागाकडून ऑनलाइन सातबारा संगणकीकृत कामकाजादरम्यान झालेल्या असल्याने अशा उपरोक्त चुका दुरुस्त करण्याकामी गेली कित्येक दिवस संबंधित खातेदार गावपातळीवरील तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.
या सर्व समस्यांवर उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या ऑनलाइन दुरुस्तीच्या कामकाजासाठी सोमवारी पडळ येथील मंडल अधिकारी कार्यालयात महसूल विभागाद्वारे वरील गावांतील खातेदारांच्या सातबारा दुरुस्तीसाठी महसूल विभागाद्वारे दुरुस्ती कॅम्पचे आयोजन केले होते. प्रत्यक्षात मात्र संबंधित खातेदारांच्या सातबारा दुरुस्तीसह इतर कोणत्याही कामाची ठोस कार्यवाही यावेळी पडळ मंडल अधिकारी कार्यालयातून झाली नसल्याने याकामी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले आहे.