आपणही माणसंच आहोत हे दाखवून द्या : बाबा आढाव

By admin | Published: February 17, 2015 12:04 AM2015-02-17T00:04:36+5:302015-02-17T00:04:47+5:30

कार्यकर्त्यांना हायसे

Show that you are a man too: Baba Adhav | आपणही माणसंच आहोत हे दाखवून द्या : बाबा आढाव

आपणही माणसंच आहोत हे दाखवून द्या : बाबा आढाव

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तत्काळ जेरबंद करण्यासाठी आज, मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चात आपणही माणसंच आहोत, हे हल्लेखोर प्रवृत्तीला दाखवून द्या. कोल्हापूरचे पोलीस हल्लेखोरांना लवकरच पकडून देतील, असा विश्वास ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी केला. पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बिंदू चौक येथे सोमवारी सायंकाळी आयोजित केलेल्या निषेध सभेत ते बोलत होते.
आढाव म्हणाले, मी बिंदू चौकातील सभेसाठी येत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने मला एक विनंती केली की, बाबा, आम्हाला आता अन्य काही काम लावू नका. आम्हाला तपासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घ्यायचे आहे, अशी विनंती केली. त्यावर तुमचा तपास आम्हाला माहीत आहे. पुणे येथे डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचे काय झाले, असे मी म्हणालो. त्यावेळी त्या अधिकाऱ्याने ‘बाबा, ते पुणे होते, हे कोल्हापूर आहे’, असे सांगितले. त्यामुळे लवकरच कोल्हापूर पोलीस हल्लेखोरांना पकडतील, असा विश्वास ठेवू. त्यांना संधी देऊ. कारण कोल्हापूरची माणसं हल्लेखोराला पकडून दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, हेही आपल्याला माहीत आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते भारत पाटणकर म्हणाले, हल्ला करणाऱ्या या भ्याड प्रवृत्तीवाद्यांनी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या लोकांची हल्ला करण्यासाठी जणू यादीच तयार करून हे हल्ले सुरू केले आहेत. येत्या चोवीस तासांत या हल्ल्यामागे सूत्रधार कोण आहेत, याचा छडा शासनाने लावला नाही, तर मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर लाखोंच्या संख्येने जमून जोपर्यंत हल्लेखोर प्रवृत्तींना अटक होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन करू, असा इशारा दिला. यावेळी माजी आमदार संपत पवार, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, बाबूराव गुरव, अतुल दिघे, गिरीश फोंडे, सीमा पाटील, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यकर्त्यांना हायसे
सायंकाळी साडेसात वाजता पानसरे अण्णांवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची व आयसीयूत शिफ्ट केल्याचे कार्यकर्त्यांना सभेदरम्यान समजताच त्यांना थोडे हायसे वाटले.

Web Title: Show that you are a man too: Baba Adhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.