‘सोशल मीडिया’वर विजयाच्या दावे-प्रतिदाव्यांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:19 AM2019-05-23T00:19:39+5:302019-05-23T00:19:44+5:30
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर निकालाचा अंदाज, विजयाच्या दावे-प्रतिदाव्यांचा वर्षाव सुरू आहे. काहींनी आपल्या उमेदवाराला विजयाच्या ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर निकालाचा अंदाज, विजयाच्या दावे-प्रतिदाव्यांचा वर्षाव सुरू आहे. काहींनी आपल्या उमेदवाराला विजयाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती व्हॉटस्अॅपवर व्हायरल केल्या आहेत.
या निवडणुकीत सोशल मीडियावर प्रचार रंगला. व्हॉटस्अॅप, फेसबुकच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील गटाने ‘आमचं ठरलंय’ अशी आणि महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी ‘स्वाभिमान कोल्हापूर’चा ही टॅगलाईन चालविली. त्याला ‘महाडिकांना जनतेनेच ठरवलंय,’ ‘आपला माणूस’ अशा टॅगलाईनने खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाने प्रत्युत्तर दिले. त्याची दखल ‘मीबी ध्यानात ठेवलंय’ असे म्हणत खुद्द राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी घेतली. अशा पद्धतीने मतदान होईपर्यंत कोल्हापूर मतदारसंघात ‘सोशल वॉर’ रंगले. हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यातील ‘सोशल वॉर’ची तीव्रता कमी होती. मतदानानंतर निवडणुकीबाबतच्या सोशल मीडियावरील संदेशांचे प्रमाण कमी झाले. गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणाला किती मते, मताधिक्य मिळणार, सन २०१४ च्या निवडणुकीत किती मते मिळाली होती, आपलाच उमेदवार कसा आणि किती मताधिक्याने विजयी होणार, विविध सर्व्हेतून समोर आलेले निकालाचे चित्र, विजयाच्या दावे-प्रतिदावे करणाºया संदेशांचा व्हॉटस्अॅप, फेसबुकवर वर्षाव होत आहे. काही समर्थक, कार्यकर्त्यांनी विजयाच्या शुभेच्छा देणाºया जाहिराती व्हायरल केल्या आहेत. त्यामध्ये कौलव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांची जाहिरात सोशल मीडियावर फिरत आहे. येत्या २३ मे रोजी घ्यावयाची काळजी, यादिवशी सर्व राजकीय पक्ष कोणती गाणी म्हणणार, आदी आशय आणि त्याला पूरक असणाºया छायाचित्रांचा समावेश असलेल्या मजेदार संदेशांची गर्दी झाली आहे. मतमोजणी कोणत्या ठिकाणी होणार, त्यासाठी किती वेळ लागणार, अशा स्वरूपातील माहितीचे संदेशदेखील ‘सोशल मीडिया’वर फिरत आहेत.
अॅडमिनवर गुन्हा
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग करणारे काही मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यास संबंधित पोस्ट व्हायरल करणारा आणि त्या ग्रुपच्या अॅडमिनवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परिक्षेत्रातील सायबर शाखांना या विशेष सूचना दिल्या आहेत. विजयी आणि पराभूत झालेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते, त्यांच्या समर्थकांनी व्हायरल केलेल्या पोस्ट कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणाºया असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
शुभेच्छांच्या जाहिराती व्हायरल;
मजेदार संदेशांनी करमणूक
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवाराचे नाव : ज्याच्या नावामध्ये ‘जय’ आहे, ज्याचे आडनाव ‘चार’ अक्षरी आहे, ज्याच्या आडनावामध्ये पहिले अक्षर ‘म’ आणि शेवटचे अक्षर ‘क’ आहे.
कोणी कितीही उड्या मारू दे, गुलाल फक्त आमचाच - एक गुलाल विक्रेता.
जर कोणत्याच पक्षाला बहुमत नाही मिळाले, तर डकवर्थ लुईस नियमानुसार राज ठाकरे हे पंतप्रधान होणार!
बरं झालं, त्या निवडणुकीप्रमाणे शाळेच्या निकालाचा एक्झिट पोल नावाचा प्रकार नव्हता. नाही तर घरच्यांनी तीन-चार दिवस अगोदर मारायला सुरुवात केली असती.