मंत्री मुश्रीफ यांच्यावर डिजिटल शुभेच्छांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:25 AM2021-04-21T04:25:19+5:302021-04-21T04:25:19+5:30
कोल्हापूर: राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा आज बुधवारी वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच जिल्ह्यातील गावे आणि शहरे ...
कोल्हापूर: राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा आज बुधवारी वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच जिल्ह्यातील गावे आणि शहरे भल्यामोठ्या डिजिटलनी सजली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमी प्रत्यक्ष हजर राहून शुभेच्छा देता येत नसल्याने कार्यकर्त्यांनी डिजिटल माध्यमाचा वापर करत लाडक्या नेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आज बुधवारी मुश्रीफ यांचा ६७ वा वाढदिवस आहे. दरवर्षी रामनवमीला ते वाढदिवस साजरा करतात. साहेबांचा वाढदिवस म्हणून थोरामोठ्यापासून गोरगरिबापर्यंत सर्वांनाच वेगळे अप्रुप असते. घरांकडे माणसांच्या रांगा लागलेल्या असतात; पण गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील या सर्व आनंदाला मुरड घालावी लागली आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे जाहीर कार्यक्रमांना फाटा देत विधायक कार्यक्रमही मुश्रीफ फौंडेशनसह कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले आहे. मास्क व सॅनिटायझर वाटपाचे कार्यक्रम जागोजागी होणार आहेत. रक्तदानाचे शिबिरही भरवण्यात येणार आहे. मंगळवारी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मंत्री मुश्रीफ यांनी दुपारी आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवालयात जाऊन दर्शन घेतले. ते दरवर्षी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी येथे येतात, यावर्षी कोरोनाची परिस्थिती असतानाही त्यांनी हा क्रम चुकवला नाही.
गेल्या वर्षी वाढदिवसाचे जंगी नियोजन करण्यात आले होते; पण कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आणि देशपातळीवरील लॉकडाऊनमुळे तो साजरा करता आला नाही. त्यांनी मुंबईत नातवंडांसमवेत घरातच केप कापून वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला होता. यावर्षी तो अधिक भव्यदिव्य स्वरूपात करण्याची तयारी सुरू होती; पण परत एकदा कोरोनामुळे उत्साहाला आवर घालावा लागला आहे. दरवर्षी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वत: मुश्रीफ कागलमध्ये उपस्थित राहत होते. यावर्षी ते कोरोना निर्बंधामुळे शुभेच्छा ऑनलाइनच स्वीकारणार असून ते कागलमध्ये उपस्थित राहणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.