नूल पंचक्रोशीचे श्रद्धास्थान लिंगैक्य श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:24 AM2021-09-13T04:24:37+5:302021-09-13T04:24:37+5:30
गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल येथील श्री सुरगीश्वर संस्थान मठाचे मठाधिपती षट्स्थळब्रह्मी उपाचार्यरत्न श्री.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे शुक्रवार, २७ ऑगस्ट, ...
गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल येथील श्री सुरगीश्वर संस्थान मठाचे मठाधिपती षट्स्थळब्रह्मी उपाचार्यरत्न श्री.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१ रोजी महानिर्वाण झाले. त्यांचा समाधी (गदगी) समर्पण आणि शिवगणाराधना कार्यक्रम आज, सोमवारी, १३ सप्टेंबर २०२१ रोजी होत आहे. त्यानिमित्त श्री. महास्वामीजींच्या आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कामगिरीचा घेतलेला आढावा..
६ एप्रिल १९३८ रोजी कणगला (ता. हुक्केरी, जि. बेळगाव) येथील कुलाचार संपन्न हिरेमठ घराण्यात श्री. महास्वामीजी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आप्पय्या लिंगय्या मठद हे धर्मनिष्ठ तर मातोश्री निलांबिका या प्रेमळ परंतु करारी स्वभावाच्या होत्या. स्वामीजींचे बालपण व प्राथमिक शिक्षण कणगला येथेच झाले.
१९५४ मध्ये वयाच्या १६व्या वर्षीच नूल येथील श्री सुरगीश्वर मठाचे तत्कालीन मठाधिपती गुरुसिद्धय्या यांनी त्यांची मठाचे उत्तराधिकारी म्हणून निवड केली. त्यात त्यावेळचे नूलचे सामाजिक कार्यकर्ते दिनकरराव शिंदे मास्तर यांनी मोलाची भूमिका बजावली. तथापि, एक विद्वान संस्कृत पंडित बनण्याची स्वामीजींची तीव्र इच्छा होती. त्यामुळे यमकनमर्डी-हत्तरगी येथे वैदिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी बंगळुरूला धाव घेतली. त्या ठिकाणी ११ वर्षे राहून शासकीय संस्कृत महाविद्यालयात रात्रंदिवस खपून त्यांनी मोठ्या जिद्दीने सुवर्णपदकासह ‘साहित्यालंकार’ ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर श्रीक्षेत्र काशी ज्ञानपीठात वर्षभर राहून त्यांनी धार्मिक शिक्षणही पूर्ण केले. दरम्यानच्या काळात त्यांचे वडीलबंधू संबय्या हिरेमठ यांनी मठाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. उच्चविद्याविभूषित झाल्यानंतर ते नूल गावी आले. नूल आणि पंचक्रोशीतील ग्रामीण लोकांच्या सामाजिक व शैक्षणिक गरजा ओळखून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. बारशे ते मुंज, वास्तुशास्त्र यासह अनेक घरगुती व सार्वजनिक अडीअडचणीसंदर्भात मार्गदर्शनासाठी भक्तगण त्यांच्याकडे हक्काने येत. परंतु, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि महात्मा बसवेश्वर यांच्या लोककल्याणाच्या विचारांची बैठक पक्की असल्यामुळे त्यांनी नेहमी खरे तेच आणि योग्य तेच सांगून त्यांच्याकडे आशेने येणाऱ्यांमध्ये जीवनाकडे बघण्याची नवी ऊर्जा निर्माण केली. म्हणूनच महास्वामीजी आणि भक्त यांच्यातील गुरुशिष्याचे नाते अखेरपर्यंत अतूट असेच राहिले. त्याचीच प्रचिती त्यांच्या अंत्ययात्रेत अनुभवायला मिळाली.