श्रावणोत्सवाची लगबग सुरू, व्रतवैकल्य, सणांची रेलचेल : बाजारपेठेत उत्हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 03:42 PM2018-08-06T15:42:37+5:302018-08-06T15:49:03+5:30

श्रावण म्हणजे हिरवाईने नटलेली वसुंधरा, व्रतवैकल्ये, सणांची रेलचेल, लहान मुलांपासून ते सुवासिनी, अबालवृद्धांपर्यंत चा लाडका महिना. त्याच्या येण्याने सृष्टी बहरते. आपसूकच वातावरणात उत्साहाचे रंग भरतात. अशा या श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागल्याने बाजारपेठेत लगबग सुरु झाली आहे.

Shravan festival celebrates festival, festival, festival festival | श्रावणोत्सवाची लगबग सुरू, व्रतवैकल्य, सणांची रेलचेल : बाजारपेठेत उत्हास

श्रावणोत्सवाची लगबग सुरू, व्रतवैकल्य, सणांची रेलचेल : बाजारपेठेत उत्हास

googlenewsNext
ठळक मुद्देश्रावणोत्सवाची लगबग सुरू, व्रतवैकल्य, सणांची रेलचेल बाजारपेठेत उत्हास

कोल्हापूर : श्रावण म्हणजे हिरवाईने नटलेली वसुंधरा, व्रतवैकल्ये, सणांची रेलचेल, लहान मुलांपासून ते सुवासिनी, अबालवृद्धांपर्यंत चा लाडका महिना. त्याच्या येण्याने सृष्टी बहरते. आपसूकच वातावरणात उत्साहाचे रंग भरतात. अशा या श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागल्याने बाजारपेठेत लगबग सुरु झाली आहे.

श्रावण महिन्यात लोकसंस्कृती मोराच्या पिसाऱ्यासारखी श्रावण सरी सोबत फुलून येते. लोकसंस्कृतीतील कीर्तने, पोथ्या, गीतांमधून श्रावण भक्तीचे रंग उलगडू लागतात.श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा, व्रत करण्याची परंपरा आहे.

रखरखत्या उन्हाळ््यानंतर सुरू होणारा पाऊस सृष्टीची दाहकता शांत करतो. याच उल्हासी वातावरणात येतो श्रावण महिना. पंचांगानुसार याच महिन्यापासून सर्व सणांना सुरुवात होते. श्रावण सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधन असे विविध सण या श्रावणोत्सवात रंग भरणार आहेत.

श्रावण सोमवार

सोमवार म्हणजे भगवान शंकराचा दिवस. श्रावण सोमवारी महिला दिवसभर उपवास करून शंकराचे दर्शन घेतात. शंकराला तांदूळ, तीळ, मूग, जवस हे धान्य शिवमूठ म्हणून वाहिली जाते. कोल्हापूर हे शिवशक्तीचे स्थान असल्याने येथे प्राचीन शिवमंदिरांची संख्या मोठी आहे. या मंदिरांत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.

मंगळागौर

या व्रतात शंकराच्या पिंडीची स्थापना करून नवीन लग्न झालेल्या सुवासिनी मंगळागौर पूजतात. दिवसभर व्रतस्थ: राहून संध्याकाळी पूजा मांडली जाते. व्रताचे वाचन करून सुवासिनींना हळदी-कुंकू देऊन गौरीचे खेळ खेळले जातात. यादिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो.

नागपंचमी

यंदा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच नागपंचमीचा सण असणार आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय सण आणि पारंपारिक सणाची जणू सांगडच निसर्गाने घातली आहे. सणाच्या आदल्या दिवशीही भावाचा उपवास करून धपाटे, काळ््या वाटाण्यांची उसळ, लाह्या असा नैवेद्य नागाच्या मूर्तीला दाखविला जातो जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र आजही मोठ्या प्रमाणात झोपाळे बांधले जातात.

राखी पौर्णिमा

या सणादिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून आपले बंधुप्रेम व्यक्त करते, तर भाऊ बहिणीला तिच्या संरक्षणार्थ सदैव तिच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे अभिवचन देतो. या सणांसह शहरातील सर्व मंदिरांमध्ये जाऊन वर्षातून एकदा देव-देवतांचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. यंदा राखी पौर्णिमा २६ तारखेला आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी :

श्रीकृष्ण जन्माष्टमी (गोपाळकाला) यंदा २ सप्टेंबरला आहे. यादिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मकाळ सोहळा साजरा केला जातो. शहरात सर्वत्र दहीहंडीचा ज्वर असतो. कोल्हापुरात गेल्या पाच-सहा वर्षांत विविध संस्थांच्यावतीने लाखोंच्या दहीहंडीचे आयोजन केले जाते.

आठवड्याचे वार मोजून चार दिवस..

यंदाच्या श्रावणात आठवड्याचे सगळे वार मोजून चार चार दिवस आले आहेत. रविवारपासून श्रावणाला सुरवात होते. त्यादिवसापासून श्रावणात चार रविवार, चार सोमवार, चार मंगळवार, चार बुधवार, चार गुरूवार, चार शुक्रवार आणि चार शनिवार आले आहेत. एकही वार जास्तीचा नाही या एक वेगळाच योगायोग यंदा आला आहे.

घरोघरी सणांची लगबग

या पवित्र महिन्याच्या आगमनासाठी आता घरोघरी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्त्या महिलांसोबतच कुटुंबातील अन्य सदस्यही या स्वच्छतेच्या कामात सहकार्य करत असल्याचे चित्र आहे.

या महिन्यात श्रावण सोमवारसह मोठ्या प्रमाणात उपवास केले जातात शिवाय मंगळागौरीसारखी व्रतवैकल्ये असतात. त्यामुळे बाजारात उपवासाचे पदार्थ आणि त्याच्या साहित्याची मोठी आवक झाली आहे. शाबूदाणा, वरीचे तांदूळ, शेंगदाणे, गूळ-साखर, तीळ, अशा उपवासाच्या साहित्याच्या खरेदीसाठी प्रमुख बाजारपेठांत नागरिकांची वर्दळ आहे.
 

 

Web Title: Shravan festival celebrates festival, festival, festival festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.