श्रावण सरी... सण समारंभ भारी...

By admin | Published: August 16, 2015 11:55 PM2015-08-16T23:55:03+5:302015-08-16T23:55:03+5:30

या काळात उपवासाचे प्रमाणही वाढते. अनेकजण एकवेळ जेवण करून महिनाभर उपवास करतात. काहीजण आठवड्यातले चार-पाच दिवस उपवास करतात, पण त्यामागेही एक वैद्यकीय कारण आहे

Shravan Sari ... Festival ceremony is heavy ... | श्रावण सरी... सण समारंभ भारी...

श्रावण सरी... सण समारंभ भारी...

Next

श्रावण म्हणजे पावसाच्या सरी, हिरवी दुलई पांघरलेली वसुंधरा, प्रत्येक थेंबानिशी स्वच्छ झालेले सृष्टी, तरारलेली शेती आणि या सगळ््यात मंगलमयी सणांची होणारी सुरुवात फक्त हिंदू संस्कृतीतच नव्हे, तर प्रत्येक पंथामध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या महिन्यातील सण-उत्सव म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. या सणांनी, व्रत-वैकल्यांनी आणि आनंददायी श्रावणाला सुरुवात झाली आहे. श्रावण सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधन असे विविध सण या श्रावणोत्सवात रंग भरणार आहेत. या महिन्यात व्रत-वैकल्यांना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. श्रावण सोमवारचा उपवास यासह शहरातील प्रमुख देवळांमध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. श्रावण सोमवार सोमवार म्हणजे भगवान शंकराचा दिवस. त्यात श्रावणात येणारे चार-पाच सोमवारी महिला दिवसभर उपवास करून शंकराचे दर्शन घेतात. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, सातू, जवस अशी शिवमूठ शंकराला वाहिली जाते. कोल्हापूर हे शिवशक्तीचे स्थान असल्याने येथे प्राचीन शिवमंदिरांची संख्या मोठी आहे. शहराच्या चोहोबाजूंनाही अगदी नदीपात्रातही शंकराची मंदिरे आहेत. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मंगळागौर या व्रतात शंकराच्या पिंडीची स्थापना करून नवीन लग्न झालेल्या सुवासिनी मंगळागौर पूजतात. दिवसभर व्रतस्थ राहून संध्याकाळी पूजा मांडली जाते. व्रताचे वाचन करून सुवासिनींना हळदी-कुंकू देऊन गौरीचे खेळ खेळले जातात. यादिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. नागपंचमी यंदा १९ आॅगस्टला नागपंचमी हा सण साजरा होत आहे. सणाच्या आदल्या दिवशीही भावाचा उपवास करून धपाटे, काळ््या वाटाण्यांची उसळ, लाह्या असा नैवेद्य नागाच्या मूर्तीला दाखविला जातो. आता गल्लो-गल्लीत झोके बांधण्याची पद्धत बंद झाली असली तरी शहरात मोजक्या एक दोन ठिकाणी झोपाळेबांधले जातात. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र आजही मोठ्या प्रमाणात झोपाळे बांधले जातात. उंचच उंच झोका घेण्याचा मनसोक्त आनंद सुवासिनी व मुली यावेळी लुटतात. राखी पौर्णिमा यंदा राखी पौर्णिमा २९ आॅगस्टला होत आहे. यादिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून आपले बंधूप्रेम व्यक्त करते, तर भाऊ बहिणीला तिच्या संरक्षणार्थ सदैव तिच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे अभिवचन देतो. या सणांसह शहरातील सर्व मंदिरांमध्ये जाऊन वर्षातून एकदा देव-देवतांचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. शिवाय कोळी लोक नारळी पौर्णिमा साजरी करून जलदेवतेला वंदन करतात.
श्रीकृष्ण जन्माष्टमीश्रीकृष्ण जन्माष्टमी यादिवशी मध्यरात्री १२ वाजता कृष्णाचा जन्मकाळ सोहळा साजरा केला जातो. यंदा ५ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी दहीहंडी फोडली जाते. यानिमित्त शहरातील विविध कृष्ण मंदिरांत भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन के ले जाते.
- इंदुमती गणेश

उपवासामागील
वैद्यकीय कारण
या काळात उपवासाचे प्रमाणही वाढते. अनेकजण एकवेळ जेवण करून महिनाभर उपवास करतात. काहीजण आठवड्यातले चार-पाच दिवस उपवास करतात, पण त्यामागेही एक वैद्यकीय कारण आहे. श्रावण आणि पावसाच्या सरी यांच्यात अतूट नाते आहे, त्यामुळे या काळात वातावरणात गारवा असतो, दमटपणा असतो. आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळेच पचनसंस्थेचे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी पोटाला हलका आहार आवश्यक असतो. उपवासामुळे पोटाला विश्रांती मिळून पचनसंस्थेवरील ताण हलका होतो. या कालावधीत भाज्यांवरही कीड लागलेली असते. याच कारणामुळे मांसाहार पूर्णत: वर्ज्य असतो. या कालावधीतील काही सणांना उकडलेले, भाजणीचे पदार्थ खाल्ले जातात, अशी माहिती डॉ. कल्याणी कदम यांनी दिली.

Web Title: Shravan Sari ... Festival ceremony is heavy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.