जोतिबा मंदिरात चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 01:52 PM2017-07-29T13:52:28+5:302017-07-29T13:54:38+5:30
कोल्हापुरात श्री जोतिबा देवाची शुक्रवारी श्रावण षष्ठी यात्रा भरली व शनिवारी चांगभलेच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता झाली आहे.
कोल्हापूर, दि. 29 - श्री जोतिबा देवाची शुक्रवारी श्रावण षष्ठी यात्रा भरली व शनिवारी चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता झाली आहे. श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी व जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरातील चोपडाईदेवीची श्रावण षष्ठी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले होते. चैत्र यात्रेनंतर भरणारी ही दुसरी मोठी यात्रा असते. दोन ते अडीच लाख भाविक मुंबई, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर भागातून येथे येतात.
जोतिबा डोंगरावर दरवर्षी श्रावण महिन्यात भरणारी श्रावण षष्ठी यात्रा ही श्री चोपडाई देवीसाठी भरवली जाते. भाविक चोपडाई देवीला साडीचोळी अर्पण करतात. शुक्रवारी धुपारती करण्यात आली. तर रात्रभर मंदिरात धार्मिक विधि सुरू होत्या. श्री चोपडाई देवीची लिंबू, बेलपत्र, पाना-फुलांची आकर्षक महापूजा बांधली जाते. रात्रभर भाविक जोतिबाच्या डोंगरावर येत असतात. स्थानिक पुजार्यांच्या घरी मुक्काम करतात. सर्व भाविक षष्ठीचा उपवास करतात.
दोन दिवस सुरू असलेल्या या यात्रेची सांगता शनिवारी सकाळी सात वाजता धुपारतीनं, चांगभलंच्या गजरात व जल्लोषात करण्यात आली.