कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सवात भाविक तल्लीन; गुजरी, महाद्वाररोडवर रांगोळी, फुलांचा वर्षाव- video
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:04 AM2024-04-25T11:04:28+5:302024-04-25T11:30:35+5:30
सायंकाळी पाऊस पडल्यानंतरही हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती
कोल्हापूर : अंबा माता की जयचा अखंड गजर, पोलिस बँडची धून, भव्य अशा रंगीबेरंगी रांगोळीचा गालिचा, फुलांचा वर्षाव आणि भाविकांच्या अलोट गर्दीत बुधवारी रात्री करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडला. सायंकाळी पाऊस पडल्यानंतरही हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत मंदिर उघडे होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते रथोत्सवाचे पूजन झाले. त्यानंतर मंदिराच्या महाद्वार रोडकडील पश्चिम दरवाजातून अंबाबाईच्या रथोत्सवाला प्रारंभ झाला. रथाचे पूजन व तोफेच्या सलामीनंतर हा सोहळा सुरू झाला. श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे महाद्वार चौक ते जोतिबा रोड चौक येथे विद्युत रोषणाई व भव्य आतषबाजी करण्यात आली. रथोत्सव मार्गावर भाविकांनी भव्य अशा रंगीबेरंगी रांगोळ्यांचा सुरेख गालिचा घातला होता. रथापुढे मानकरी व मागे देवीची स्तुती करणारे मंत्रोच्चार व भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय बनले होते.
रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी अंबा माता की जयचा गजर करत फुलांचा वर्षाव केला. अतिशय देखण्या लाकडी रथात अंबाबाईची उत्सवमूर्ती विराजमान झाली. आबालवृद्ध, महिला, युवक, युवती तिचे दर्शन घेतले. महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, गुरू महाराज वाडा, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे पुन्हा महाद्वारात येऊन रथोत्सवाची सांगता झाली. रथोत्सव आणि रांगोळ्याचा फोटो टिपण्यासाठी अनेकांचे मोबाइल सरसावले होते.
पावसाने रांगोळी वाहून गेली तरीही
गुजरी, महाद्वार रोडवर सायंकाळी चार वाजता रांगोळ्या काढण्यास सुरुवात केली. अनेक भाविकांच्या निम्या रांगाळ्या काढून पूर्ण झाल्या होत्या. दरम्यान, पाऊस पडला. त्यामुळे पावसाच्या पाण्याने रांगाळी वाहून गेली. पण भक्तांचा उत्साह कायम असल्याने पुन्हा नव्याने रांगाळ्या रेखाटल्या. न्यू गुजरी मित्रमंडळाने ८५० किलो रांगाळीचे वाटप केले. महाप्रसाद देण्यात आला.
रांगोळीतून मतदानासंबंधी जनजागृती
लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान आहे. लोकशाही अधिक सदृढ होण्यासाठी मतदान करा, मतदानाचा हक्क बजवा, मतदार राजा जागा हो, लोकशाही धागा हो, आपला हक्क, आपला अधिकार, बनुया सुजाणन अन् जागरूक मतदार, माझे मत विकासाला असा रांगाेळीत रेखाटलेला आशय लक्षवेधी ठरला.