Kolhapur: ललिता पंचमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाईने घेतली त्र्यंबोली देवीची भेट, कोहळ्यासाठी नागरिकांची झटापट
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 19, 2023 06:35 PM2023-10-19T18:35:30+5:302023-10-19T18:36:36+5:30
अलोट गर्दीत पार पडली त्र्यंबोली यात्रा
कोल्हापूर : अंबा माता की जयचा गजर, शाही लवाजमा, छत्रपतींच्या हस्ते कुमारिका पूजन, आरती, बंदूकांच्या फैरी झाडून सलामी, करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवी या प्रिय सखींची भेट, पारंपारिक वाद्यांचा गजर अशा उत्साही वातावरणात गुरुवारी त्र्यंबोली यात्रा पार पडली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा टेकडीवर भाविकांची अलोट गर्दी होती. कोहळा घेण्यासाठी नागरिकांमध्ये काही काळ झटापट झाली.
नवरात्रौत्सवात ललिता पंचमीला त्र्यंबोली यात्रा असते. यानिमित्त गुरुवारी सकाळी सहा वाजता अंबाबाईची पालखी लव्याजम्यानिशी मंदिरातून बाहेर पडली. शाहू मिल, टाकाळा चौक येथे विसावा घेत व वाटेत भाविकांकडून आरती, स्विकारत दुपारी पावणे एक वाजता पालखी टेकडीवर पोहोचली. याचवेळी जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवी व गुरुमहाराजांची पालखीही आली.
सव्वा एक वाजता अंबाबाई व त्र्यंबोली देवीची भेट झाली. देवीची आरती झाली. माजी खासदार संभाजीराजे व शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गुरव घराण्यातील ९ वर्षाची कुमारिका नारायणी गुरव हिचे पूजन झाले. तिच्या हस्ते त्रिशुळाने कुष्मांड (कोहळा) भेदन विधी पार पडला. बंदुकीच्या फैरी झाडून देवीला सलामी देण्यात आली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा विधी होताच कोहळा घेण्यासाठी नागरिकांची झटापट सुरु झाली. टेकडीवर जवळपास १० -१५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर पालख्या परतीसाठी मार्गस्थ झाल्या. सायंकाळी अंबाबाईची पालखी मंदिरात परतली.